Join us  

परदेशवारी केलेल्या प्रवाशांवर वॉर रूमचा ‘वॉच’; होमक्वारंटाइन नियम मोडल्यास...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2021 8:52 AM

दक्षिण आफ्रिका, युरोप आदी ओमायक्रॉन संक्रमित देशांमधून दररोज काही प्रवासी मुंबई विमानतळावर उतरत आहेत. मागील महिनाभरात सुमारे तीन हजार प्रवासी मुंबईत आले आहेत.

मुंबई : ओमायक्रॉन संक्रमित देशांमधून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरही त्यांना सात दिवस होमक्वारंटाइन व्हावे लागणार आहे. या प्रवाशांवर पालिकेच्या वॉर्ड वॉर रुममार्फत दररोज पाचवेळा फोन करून व अचानक भेट देऊन लक्ष ठेवले जाणार आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रवाशाची रवानगी संस्थात्मक विलगीकरणात होईल, असा सक्त इशाराही पालिका प्रशासनाने दिला आहे. 

दक्षिण आफ्रिका, युरोप आदी ओमायक्रॉन संक्रमित देशांमधून दररोज काही प्रवासी मुंबई विमानतळावर उतरत आहेत. मागील महिनाभरात सुमारे तीन हजार प्रवासी मुंबईत आले आहेत. त्यांची चाचणी सुरू असून आतापर्यंत एकूण १६ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. परदेशातून आलेला एकही प्रवासी पूर्ण चाचणी झाल्याशिवाय पालिकेच्या नजरेतून सुटू नये, यासाठी यंत्रणा सतर्क आहे. याबाबत आयुक्त इकबालसिंह चहल यांनी शनिवारी नियमावली जाहीर केली. 

परदेशातून आलेले १३ प्रवासी कोविड पॉझिटिव्हओमायक्रॉन संक्रमित देशातून आलेल्या प्रवाशांची वेगाने चाचणी केली जात आहे. यापैकी आतापर्यंत कोरोनाबाधित नऊ रुग्ण आढळून आले होते. यामध्ये आणखी चार जणांची भर पडली आहे. विशेष म्हणजे, एकूण १३ बाधित रुग्णांच्या संपर्कात आल्याने चार जणांना कोविड झाला आहे. त्यामुळे या सर्व बाधितांचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंग चाचणीसाठी पाठविण्यात आले आहेत. याबाबतचा अहवाल दोन दिवसात अपेक्षित आहे.

मागील महिनाभरात ओमायक्रॉन संक्रमित देशातून ३,७६० प्रवासी मुंबईत आले आहेत. यापैकी २,७९४ प्रवाशांची कोविड चाचणी करण्यात आली आहे. यापैकी आतापर्यंत १३ जणांना कोविड झाला आहे. यात १२ पुरुष व एका महिला रुग्णाचा समावेश आहे तर, या रुग्णांच्या संपर्कात आल्याने चौघांना कोविडची लागण झाली आहे. पालिकेने नऊ रुग्णांची एस जीन चाचणी केली होती. यापैकी सात जणांची चाचणी निगेटिव्ह आल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

महापालिकेचा ॲक्शन प्लॅनहायरिस्क आणि ॲटरिस्क अशा दोन श्रेणीनुसार दररोज सकाळी ९ वाजता प्रवाशांची माहिती विमानतळ प्रशासनाने पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला पाठवण्यात येईल. तसेच मागील १५ दिवसांतील प्रवाशांची यादीही पाठवली जाणार आहे. ही माहिती एका सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापन विभागाने दररोज सकाळी १० वाजता प्रत्येक प्रभागातील प्रवाशांच्या नावासह वॉर्ड वॉर रुमला आणि सार्वजनिक आरोग्य विभागाला पाठवण्यात येईल.

या प्रवाशांची माहिती, त्यांचे निवासस्थान असलेल्या सोसायटीतील जबाबदार व्यक्तीलाही द्यावी. या व्यक्तीने प्रवास करुन आलेली व्यक्ती होम क्वारंटाइनचे नियम पाळत आहे का? यावर लक्ष ठेवले जाईल. वॉर्ड वॉर रूमच्या माध्यमातून होम क्वारंटाइन प्रवाशांवर नजर ठेवली जाणार आहे. त्यांना कोणालाही भेटण्याची परवानगी नसेल.गरज भासल्यास उपचार करता यावेत यासाठी प्रत्येक वॉर्ड वॉर रुम अंतर्गत दहा रुग्णवाहिका तैनात असणार आहेत. सध्या केवळ दोन ते तीन रुग्णवाहिका आहेत. नियम मोडल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच पालिकेच्या क्वारंटाइन व्यवस्थेत ठेवण्यात येईल. सातव्या दिवशी प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी होईल, याची खबरदारी घेतली जाणार आहे.

अशी आहे विभागणीनव्या नियमावलीनुसार धोका अधिक (हायरिस्क) आणि धोक्याची शक्यता असलेले देश अशी विभागणी करण्यात आली आहे. ‘हायरिस्क’ देशांमध्ये दक्षिण आफ्रिका, बोस्वाना व झिम्बाबेचा समावेश आहे. या देशांतून आलेल्या प्रवाशांचा कोविड चाचणी अहवाल निगेटिव्ह आला तरी त्यांना सात दिवस क्वारंटाइन केले जात आहे. आतापर्यंत १७ प्रवाशांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. इतर देशांमधून आलेल्या प्रवाशांनाही होमक्वारंटाइन बंधनकारक आहे.

टॅग्स :ओमायक्रॉनकोरोना वायरस बातम्यामुंबई