Join us

कोरोनासह पावसाळी आजाराचे रुग्ण शोधण्यासाठी वॉर रूमची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई - कोरोना काळात मुंबई महानगरपालिकेने सुरू केलेल्या वॉर रूमचा सर्वाधिक फायदा झाला. आता कोरोना रुग्णसंख्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई - कोरोना काळात मुंबई महानगरपालिकेने सुरू केलेल्या वॉर रूमचा सर्वाधिक फायदा झाला. आता कोरोना रुग्णसंख्या घटत असताना, याच वॉर रूमचा कल्पकतेने वापर करण्यात येणार असल्याची माहिती पालिका रुग्णालये संचालक डॉ. रमेश भारमल यांनी दिली. आता हे वॉर रूम प्रभागातील पावसाळी आजाराचे रुग्ण सांगणार असून त्याचे निदानही करणार आहे.

पावसाळी आजाराची समस्या असल्यास वॉर रूमला कळविण्याचे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. सध्या पावसाळा सुरू असून पावसाळी आजारांपैकी ताप, मलेरिया, डेंग्यू, लेप्टो आदी कोणतीही तक्रार असल्यास वॉर रूमशी संपर्क करावयाचा आहे. याची नोंद वॉर रूम घेणार असून वॉर रूम त्या प्रभागातील आरोग्य विभागाशी संपर्क करणार आहे. पुढील उपाययोजना करण्यास हा प्रभाग त्या त्या संबंधित विभागाशी आदेश होणार आहेत. कोरोना काळात स्थापन केलेले वॉर रूम हे बहुउद्देशीय असून या रूमचा वापर इतर आजारांसाठी होणार आहे.

दरम्यान, पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, ११ जुलैपर्यंत मलेरियाचे १९९१, लेप्टोचे ७४, डेंग्यूचे ५७, गॅस्ट्रोचे १३८४, हिपॅटायटिसचे ९५, तर एच१एन१ आजाराचे १९ अशा रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यात मलेरिया आणि गॅस्ट्रो आजाराचे रुग्ण सर्वाधिक आहेत.

कोट

प्रत्येक प्रभागातील कोणत्याही आजाराची सांख्यिकी माहिती पालिकेकडे वॉर रूममधून उपलब्ध होईल. यामुळे कोणत्या विभागात कोणता आजार बळावतो, याचा विचार करून उपाययोजना करण्यात येईल. त्यानुसार स्थानिक आरोग्य सेवा केंद्राची मदत घेता येईल.

- डॉ. रमेश भारमल, संचालक, महापालिका रुग्णालये