Join us  

फ्लेमिंगो पाहायचेत, उपनगराकडे चला! पक्षीप्रेमी, अभ्यासकांनाही मिळणार पर्वणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 11:22 AM

येत्या वर्षभरात भांडुपमध्ये फ्लेमिंगोंचे थवे पाहायला मिळतील. त्यामुळे पर्यटकांसोबत पक्षीप्रेमी आणि अभ्यासकांनाही पर्वणी मिळणार आहे.

मुंबई : मुंबईचे पूर्व उपनगर येत्या काळात फ्लेमिंगोचे उपनगर झाल्यास आश्चर्य वाटायला नको. शिवाय फ्लेमिंगो पाहायला शिवडीपर्यंतही जाण्याची आवश्यकता नाही. येत्या वर्षभरात भांडुपमध्ये फ्लेमिंगोंचे थवे पाहायला मिळतील. त्यामुळे पर्यटकांसोबत पक्षीप्रेमी आणि अभ्यासकांनाही पर्वणी मिळणार आहे.

याआधी फ्लेमिंगी पाहण्यासाठी शिवडीच्या खाडीकडे जावे लागत असे. सर्वसामान्य मुंबईकर, विद्यार्थी आणि पर्यटक यांची गर्दी इथे असते. अलीकडच्या काळात नवी मुंबई ऐरोलीचा परिसर फ्लेमिंगो अभयारण्य म्हणून घोषित केला आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या सहली येथे येत असतात.   त्यामुळे  फ्लेमिंगो दर्शनासाठी थेट शिवडीला जाण्याची गरज उरलेली नाही. ऐरोली पाठोपाठ आता भांडुपमधेही  फ्लेमिंगो मुक्कामाला येणार आहेत. या भागात त्यांच्यासाठी खास फ्लेमिंगो पार्क उभारले जाणार आहे. त्यासाठी ४० लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. केंद्र सरकारच्या अमृत व मिष्टी या योजनेतून हे पार्क उभे राहील. पार्कसाठी तरंगती जेट्टी, जोडरस्ता बांधला जाणार आहे. भांडूप पंपिंग स्टेशन खाडी परिसरात उभारल्या जाणाऱ्या  पार्कच्या ठिकाणी पर्यटकांसाठी फेरी बोटसेवा सुविधाही उपलब्ध असेल. 

पोषक वातावरण -

भांडूप, नाहूर, विक्रोळी, कांजुरमार्ग हा पट्टा प्रामुख्याने पानस्थळाचा आहे.  या पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर मिठागरे आहेत. महामार्गाच्या पूर्वेला वाशीची खाडी आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर जैवविविधता आहे. मोठ्या प्रमाणावर मासे आहेत. विविध प्रकारचे कीटक आहेत. एकूणच फ्लेमिंगोसाठी मुबलक प्रमाणात खाद्य उपलब्ध आहे.  ऐरोली परिसरातही असेच वातावरण असल्याने तेथे फ्लेमिंगोचा वावर वाढला आहे.

पक्षी पार्क -

भांडुपला लागून असलेल्या नाहूर परिसरातही आगामी काळात परदेशी पक्ष्यांची किलबिल कानावर पडणार आहे. या भागात मुंबई महापालिका पक्षी केंद्र उभारणार आहे. या केंद्रात सगळे पक्षी हे परदेशातील असतील. साहजिकच पक्षीप्रेमींना भायखळ्याच्या जिजामाता उद्यानासह आणखी एक पर्याय उपलब्ध होईल.

टॅग्स :मुंबईभांडुप पश्चिम