Join us  

गावी जायचेय! रिझर्व्हेशन हमखास मिळणार; कोकणसाठी विशेष रेल्वे

By कमलाकर कांबळे | Published: April 08, 2024 7:37 PM

उन्हाळी सुट्यांसाठी मुंबईहून प्रवाशांसाठी सुविधा

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : कोकण रेल्वेने उन्हाळी हंगामासाठी विविध मार्गांवर विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात प्रवाशांची हाेणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन या विशेष गाड्या चालविल्या जाणार आहेत. त्यानुसार ११ एप्रिलपासून मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनल ते कोचुवेली यादरम्यान ही गाडी चालविली जाणार आहे. विशेष म्हणजे गेल्या आठवड्यात उधना जंक्शन ते मंगळुरूदरम्यान विशेष द्विसाप्ताहिक गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत.

शाळा आणि महाविद्यालयांच्या परीक्षा संपल्याने विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्या सुरू झाल्या आहेत. त्यानुसार अनेकांनी फिरायला किंवा गावी जाण्याचा बेत आखला आहे. त्यामुळे कोकण रेल्वेच्या विविध मार्गांवरील गाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दी होत आहे. प्रतीक्षायादीवर असलेल्या प्रवाशांना दिलासा देण्याच्या दृष्टीने मध्य रेल्वेच्या समन्वयाने कोकण रेल्वेने ११ एप्रिल ते ८ जून या कालावधीत विशेष साप्ताहिक गाडी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. लोकमान्य टिळक टर्मिनल - कोचुवेली (०१४६३) ही विशेष साप्ताहिक गाडी ११ एप्रिल ते ६ जून या कालावधीत प्रत्येक गुरुवारी सांयकाळी ४ वाजता सुटणार आहे.

ही गाडी दुसऱ्या दिवशी रात्री ८:४५ वाजता कोचुवेली स्थानकात पोहोचेल. त्याचप्रमाणे परतीच्या प्रवासासाठॅ कोचुवेली - लोकमान्य टिळक टर्मिनल (०१४६४) ही विशेष साप्ताहिक गाडी १३ एप्रिल ते ८ जून या कालावधीत धावणार आहे. ही गाडी प्रत्येक शनिवारी सांयकाळी ४:२० मिनिटांनी कोचुवेली स्थानकातून सुटेल, तर दुसऱ्या दिवशी रात्री ९:५० मिनिटांनी लोकमान्य टिळक स्थानकावर पोहोचेल, असे कोकण रेल्वेने कळविले आहे.

- या स्थानकांवर थांबाउन्हाळी हंगामासाठी चालविल्या जाणारी विशेष साप्ताहिक गाडी ठाणे, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, सावंतवाडी रोड, मडगाव जं., कारवार, कुमटा, कुंदापुरा, उडुपी, मनाग्लुरु जं., कासरगोड, कन्नूर, कालिकत, तिरूर, शोरनूर जं., एर्नाकुलम टाऊन, कोट्टायम, तिरुवल्ला, चेंगन्नूर, कायनकुलम आणि कोल्लम जंक्शन या स्थानकांवर थांबणार आहे.

टॅग्स :कोकण रेल्वे