Join us  

वाट पाहून वकील झालेला मुलगा अनुकंपा नोकरीस अपात्र

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 5:39 AM

रत्नागिरी जिल्हा न्यायालयातील एक लघुलेखक चंद्रकांत आर. शेट्ये यांच्या निधनानंतर, त्यांच्या पत्नीने मोठ्या मुलाला अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळावी, म्हणून अर्ज केला. त्या अर्जावर निकाल होईपर्यंत दरम्यानच्या काळात मुलगा एलएलएमपर्यंत शिकून त्याच न्यायालयात वकिली करू लागला.

विशेष प्रतिनिधीमुंबई : रत्नागिरी जिल्हा न्यायालयातील एक लघुलेखक चंद्रकांत आर. शेट्ये यांच्या निधनानंतर, त्यांच्या पत्नीने मोठ्या मुलाला अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळावी, म्हणून अर्ज केला. त्या अर्जावर निकाल होईपर्यंत दरम्यानच्या काळात मुलगा एलएलएमपर्यंत शिकून त्याच न्यायालयात वकिली करू लागला. त्यामुळे आता ते कुटुंब आर्थिक विवंचनेत राहिलेले नाही, असे म्हणून उच्च न्यायालयाने अनुकंपा नोकरीसाठीची याचिका फेटाळून लावली.शेट्ये यांचे ३० आॅक्टोबर २००६ रोजी नोकरीत असताना निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी स्नेहल व दोन मुलगे असा परिवार होता. त्या वेळी मोठा मुलगा गौरव ११ वर्षांचा होता व इयत्ता आठवीत शिकत होता. स्वत: स्नेहल फक्त नववी पास असल्याने त्यांनी गौरवला अनुकंपा नोकरी मिळावी, म्हणून अर्ज केला. गौरव सज्ञान होईल, तेव्हा त्या अर्जावर विचार होऊ शकेल, असे त्यांना कळविले गेले. गौरव सज्ञान झाल्यावर एप्रिल २०११ मध्ये पुन्हा अर्ज केला गेला व तो आॅगस्ट २०१३ मध्ये फेटाळला गेला.स्नेहल व गौरव यांनी याविरुद्ध लगेच उच्च न्यायालयात याचिका केली. अर्ज केला, तोपर्यंत गौरव इयत्ता १२वी उत्तीर्ण झाला होता. त्याशिवाय ४० शब्द प्रति मिनीट इंग्रजी टंकलेखन व संगणक शिक्षणाची ‘एमएच-सीआयटी’ परीक्षाही तो उत्तीर्ण झाला.चार वर्षे प्रलंबित राहून याचिका अंतिम सुनावणीला आली, तोपर्यंत गौरव एलएमएम होऊन वकिली करू लागला होता. नोकरी मिळाली, तर ती करण्याची तयारी त्याने दाखविली, परंतु मुळात चंद्रकांत यांचे निधन झाले, तेव्हाही शेट्ये कुटुंबाची आर्थिक स्थिती अनुकंपा नोकरीच्या नियमांत बसेल, एवढी खराब नव्हती. शिवाय आता तर गौरव वकिली करत असल्याने कुटुंब आर्थिक विवंचनेत नाही, असे म्हणून न्या. नरेश पाचील व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने याचिका फेटाळली. अनुकंपा नोकरीसाठी उच्च न्यायालय प्रशासनाने सन २००७ मध्ये जारी केलेल्या सुधारित मार्गदर्शिकेतील नियम ७ (ए) व (बी)च्या वैधतेस दिलेले आव्हानही अमान्य केले गेले.का नाकारली नोकरी? अर्ज केला, तेव्हा गौरव पदवीधर नव्हता. त्याने अर्ज केलेल्या ‘क’ वर्ग पदासाठी ती शैक्षणिक अर्हता होती. इंग्रजी टंकलेखन येत असले, तरी त्याला मराठी टंकलेखन येत नव्हते. ज्या पदासाठी अर्ज केला आहे, त्या पदाच्या पगाराहून कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न जास्त असेल, तर ती अपात्रता ठरते. शेट्ये कुटुंबाचे उत्पन्न त्याहून जास्त होते.

टॅग्स :मुंबईउच्च न्यायालय