Join us  

दुर्बलांना प्रवेश देणाऱ्या शाळांना शुल्क प्रतिपूर्तीची प्रतीक्षाच 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2021 8:16 AM

मात्र कोरोना काळातील अडचणींमुळे प्रतिपूर्तीची रक्कम शाळांना वितरित करता आली नसली तरी येत्या काळात लवकरात लवकर केली जाईल

सीमा महांगडेमुंबई : दुर्बल व वंचित घटकातील बालकांना मोफत प्रवेश देणाऱ्या शाळांना शैक्षणिक खर्चाच्या प्रतिपूर्तीपोटी १७ हजार ६५० इतकी रक्कम अदा करण्यात येते. अनेकदा त्यामध्ये अनियमितता असल्याने शाळा प्रतिपूर्तीची रक्कम न मिळाल्याचे कारण देऊन प्रवेशाना आडकाठी करत असल्याचे दिसून आले आहे. मुंबई जिल्ह्याला अद्याप २०१९-२० आणि २०२०-२१ या वर्षाची प्रतिपूर्तीची रक्कम येणे बाकी असून मागील वर्षांतील काही शिल्लक मिळणे बाकी असल्याची माहिती मिळाली आहे. यंदा सुरु झालेल्या प्रक्रियेची प्रतिपूर्तीची रक्कम शाळांची नोंदणी झाल्यावर लगेचच शासनाला कळविली जाणार असल्याचीही माहिती देण्यात आली आहे.

अनेक शाळांनी २०१९-२० ची प्रतिपूर्तीची रक्कम न मिळाल्याने यंदाच्या वर्षासाठी नोंदणी करण्याचा मार्ग निवडण्याचा विचार केला आहे. आधीच कोरोना काळात विद्यार्थ्यांनी न भरलेल्या  शुल्काअभावी शाळा व्यवस्थापनाचे कंबरडे मोडले असून त्यातही प्रतिपूर्तीची रक्कम मिळाली नाही तर आम्ही नोंदणी करण्यासाठी विचार करू असा पवित्रा मुंबई उपनगरातील इंग्रजी माध्यमाच्या एका शाळेच्या प्रशासनाने घेतला असल्याची माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे; मात्र कोरोना काळातील अडचणींमुळे प्रतिपूर्तीची रक्कम शाळांना वितरित करता आली नसली तरी येत्या काळात लवकरात लवकर केली जाईल अशी महिती मुंबई उपसंचालक कार्यालयातून देण्यात आली आहे.

२०१९-२० वर्षांत किती मिळाले ?२०१९-२० या वर्षांत कोरोना कालखंडामुळे मार्च २०२० पासून लॉकडाऊन कालावधी सुरु झाल्यामुळे प्रतिपूर्तीची रक्कम पुन्हा परत गेली असून शाळांना ती वितरित करणे शक्य झाले नाही. या कारणास्तव २०१९ २० साठी प्रतिपूर्तीची आवश्यक रक्कम आणि येणाऱ्या प्रवेशांसाठीची रक्कम लवकरच प्राथमिक संचलनालयाला कळविण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

टॅग्स :मुंबईशाळा