माथेरान : येथील विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी बॅटरी आॅपरेट रिक्षा सुरु करण्यास सरकारने परवानगी द्यावी, या मागणीसाठी माथेरानमधील श्रमिक रिक्षा संघटना शासन दरबारी पाठपुरावा करीत आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि जिल्ह्याच्या खासदारांना संघटनेचे अध्यक्ष शकील पटेल यांनी निवेदने सादर केले. दरम्यान, ब्रिटिश काळापासून असलेल्या निर्बंधामुळे प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर बंदी आजही कायम आहे. माथेरानमध्ये एक रिक्षाचालक चार ते पाच प्रवाशांना रिक्षामधून वाहून नेतात. ही अमानवी कृती समाजाला कोणत्या युगात घेऊन जाणारी आहे, तो प्रकार बंद व्हावा आणि सर्वांनी समाजात सन्मानाने जगावे, यासाठी माथेरानमधील श्रमिक रिक्षा संघटना प्रयत्न करीत आहेत. माथेरानमध्ये ब्रिटिश काळापासून प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर बंदी असल्याने प्रदूषण न करणारी बॅटरी आॅपरेटेड रिक्षा चालविण्यास परवानगी द्यावी, यासाठी ही संघटना गेली काही वर्षे पाठपुरावा करीत आहे. माथेरानची एका बाजूला असलेली लोकवस्ती आणि येथील विद्यार्थ्यांना प्राथमिक तसेच माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी एका टोकाला म्हणजे दररोज चार ते पाच किलोमीटर पायी चालत जावे लागते. त्यांचे कष्ट कमी करण्यासाठी श्रमिक रिक्षा संघटना पाठपुरावा करीत आहे. येथील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी तारेवरची कसरत करीतच प्रवास करावा लागत असल्याने काही विद्यार्थ्यांनी केवळ प्रवासामुळेच शिक्षण सोडले. या प्रकारानेच संघटनेचे अध्यक्ष शकील पटेल यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देत बॅटरीवर चालणारी रिक्षा सुरु करण्याचा निर्णय घेण्याची मागणी केली. याआधीही मागण्यांसाठी संघटनेने मावळ मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांना निवेदन दिले, त्यावेळी अध्यक्ष पटेल यांच्यासह उपाध्यक्ष, माजी नगरसेवक प्रकाश सुतार, तसेच सुनील शिंदे आणि सचिव, माजी नगरसेवक संतोष शिंदे हे उपस्थित होते. (वार्ताहर)
माथेरानमध्ये बँटरी आॅपरेट रिक्षाची प्रतीक्षा
By admin | Updated: February 8, 2015 22:36 IST