Join us
Daily Top 2Weekly Top 5

अंत्यसंस्कारासाठी खड्ड्यातून काढावी लागते वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कुर्ला पश्चिमेकडील बैलबाजार मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करताना ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कुर्ला पश्चिमेकडील बैलबाजार मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करताना वाहनचालकांसह पादचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गावर सोनापूर गल्ली येथे स्मशानभूमी आहे. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्यांनाही या खड्ड्यातूनच वाट काढावी लागत आहे.

कुर्ला अंधेरी मार्गावर मगन नथुराम मार्ग म्हणजे बैल बाजार रोड आहे. या मार्गावर मोठा बाजार भरत असून, पादचारी आणि वाहनचालकांची कायम वर्दळ असते. त्यामुळे या मार्गावरील खड्ढ्यामुळे अपघातांच्या संख्येतही वाढ झाली आहे. येथील मार्गावर तात्पुरत्या स्वरूपात रस्त्यावर खडी टाकून काही ठिकाणी खड्डे बुजविण्यात आले होते. मात्र, या खडीमुळे दुचाकी घसरून अपघात होण्याची शक्यता अधिक आहे.

हा रस्ता एक दिशा असतानादेखील उलट मार्गाने प्रवास करणाऱ्या वाहनांची संख्या मोठी असते. मुंबई महापालिकेने या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात यावे आणि रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. याबाबत मनसेचे नगरसेवक संजय तुर्डे म्हणाले की, बैलबाजार मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. यावर मुंबई महापालिकेने उपाययोजना करणे आवश्यक आहे. याबाबत पालिकेला सातत्याने माहिती दिली असून, खड्डे बुजविण्याची मागणीही त्यांनी केली. मगन नथुराम मार्ग हा डांबरी आहे. येथे खड्ड्यांचे प्रमाण अधिक आहे. हा रस्ता सिमेंट काँक्रीटचा केल्यास कायमची समस्या सुटेल. त्यासाठी प्रशासनाने तत्काळ रस्त्याचे काम हाती घ्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.