Join us  

VIDEO - प्रतिक्षा संपली! पहिली एसी लोकल बोरीवलीहून चर्चगेटच्या दिशेने रवाना

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2017 10:51 AM

मागच्या एक-दोन वर्षांपासून चर्चा असलेल्या एसी लोकल सेवेचा आज अखेर शुभांरभ झाला आहे.

ठळक मुद्देसोमवारी सकाळी 10 वाजून 30 मिनिटांनी बोरीवली स्थानकातून 'भारतमाता की जय' या घोषणांमध्ये पहिली एसी लोकल चर्चगेटच्या दिशेने रवाना झाली. शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी एसी लोकलच्या पहिल्या फेरीला हिरवा झेंडा दाखवला.

मुंबई - मागच्या एक-दोन वर्षांपासून चर्चा असलेल्या एसी लोकल सेवेचा आज अखेर शुभांरभ झाला आहे. सोमवारी सकाळी 10 वाजून 30 मिनिटांनी बोरीवली स्थानकातून 'भारतमाता की जय' या घोषणांमध्ये पहिली एसी लोकल चर्चगेटच्या दिशेने रवाना झाली. पहिलीच फेरी असल्याने एसी लोकलला फुलांच्या माळांनी सजवण्यात आले होते. महिला तसेच अन्य प्रवाशांनी एसी लोकलमध्ये ग्रुपने सेल्फी काढण्याचा आनंद घेतला. 

शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी एसी लोकलच्या पहिल्या फेरीला हिरवा झेंडा दाखवला. आजपासून बोरीवली ते चर्चगेट मार्गावर एसी लोकल धावेल. पहिल्या वातानुकूलित लोकलच्या प्रवासासाठी १६५ रुपये मोजावे लागतील. चर्चगेट ते विरार एसी लोकलचा मासिक पास २०४० रुपये आहे.

एसी लोकल सेवेत दाखल कधी होणार, याची माहिती शुक्रवार रात्रीपर्यंत अधिका-यांना नव्हती. खासगीत ती नाताळच्या मुहूर्तावर धावेल, असे अधिकारी सांगत होते. अधिकृत घोषणा शनिवारी झाली. एसी लोकलचे दर हे प्रथम दर्जापेक्षा जास्त आहेत. सुरुवातीचे सहा महिने प्रदर्शनीय सूट म्हणून भाडे १.२ पट आकारण्यात येईल. नंतर ते १.३ पट होईल. आठवड्यातील पाच दिवस ही लोकल धावेल. 

वेग ताशी ९०-१०० किमी असेल. प्रवासी सुविधेसाठी रेल्वे सुरक्षा दलाचे जवान डब्यात असतील. शनिवार, रविवार देखभालीसाठी ती कारशेडमध्ये उभी राहणार असल्यामुळे सुट्टीच्या दिवशी एसी लोकल सफरीचा आनंद घेता येणार नाही.

प्रवास तिकीटदर (अंदाजित)

चर्चगेट ते मुंबई सेंट्रल ६० रु.

चर्चगेट ते दादर ९० रु.

चर्चगेट ते वांद्रे ९० रु.

चर्चगेट ते अंधेरी १३५ रु.

चर्चगेट ते बोरिवली १८५ रु.

चर्चगेट ते भाईंदर २०५ रु.

चर्चगेट ते वसई २१० रु.

चर्चगेट ते विरार २२० रु.

गाडीचा वेग : ११० किमी प्रतितास

प्रवासी क्षमता : ५,९६४ आसने : १,०२८

असे आहे वेळापत्रक

एसी लोकल जलद मार्गावर चालविण्यात येणार असून फक्त सकाळची पहिली फेरी धिम्या मार्गावर चालेल. ही लोकल महालक्ष्मी स्थानकातून सकाळी ६.५८ वाजता सुटेल आणि बोरिवलीला धिम्या मार्गावरून स. ७.५० वाजता पोहोचेल. बोरिवलीहून चर्चगेटपर्यंतची जलद सेवा स. ७.५४ वाजता सुटणार आहे.

बोरिवली (स. ७.५४) ते चर्चगेट (स. ८.५०)

चर्चगेट (स. ८.५४) ते विरार (स. १०.१३)

विरार (स. १०.२२) ते चर्चगेट (स. ११.१६)

चर्चगेट (स. ११.५०) ते विरार (दु. १.०५)

विरार (दु. १.१८) ते चर्चगेट (दु. २.४४)

चर्चगेट (दु. २.५५) ते विरार (दु. ४.१२)

विरार (दु. ४.२२) ते चर्चगेट (सायं. ५.४२)

चर्चगेट (सायं. ५.४९) ते बोरिवली (सायं. ६.४१)

बोरिवली (सायं. ६.५५) ते चर्चगेट (सायं. ७.४४)

चर्चगेट (सायं. ७.४९) ते विरार (रा. ९.१५)

विरार (रा. ९.२५) ते चर्चगेट (रा. १०.४८)

टॅग्स :एसी लोकलपश्चिम रेल्वे