Join us

वायफळ

By admin | Updated: February 8, 2015 02:11 IST

दादर टीटीच्या सिग्नलला दहाएक मिनिटांपासून रस्ता ओलांडण्यासाठी आजीबाई उभ्या होत्या. एक, दोन सिग्नल गेल्यानंतरही आजीबाई गोंधळलेल्या तशाच उभ्या होत्या.

आजीबाई, कानाचा मोबाइल काढा आता...दादर टीटीच्या सिग्नलला दहाएक मिनिटांपासून रस्ता ओलांडण्यासाठी आजीबाई उभ्या होत्या. एक, दोन सिग्नल गेल्यानंतरही आजीबाई गोंधळलेल्या तशाच उभ्या होत्या. तेवढ्यात रिंग वाजत असलेला मोबाइल आजीबार्इंनी कानाला लावला. चार वेळा हॅलो बोलून समोरून काहीच आवाज येत नसल्याने त्यांनी तो बंद केला. पण रस्ता काही क्रॉस होईना. हे पाहत असलेल्या वाहतूक पोलिसांनी अखेर सिग्नल लागल्यानंतर वेडीवाकडी वाहतूक थांबविली. कडेला उभे असलेले पादचारी रस्ता ओलांडून पलीकडे निघूनही गेले. पण पुन्हा मोबाइलची रिंग वाजल्याने मोबाइल कानाला लावलेल्या आजीबाई गोंधळून गेल्या. तेव्हा मात्र वाहतूक पोलीस ओरडला. ‘आजीबाई, तो मोबाइल ठेवा आता आणि रस्ता क्रॉस करा.’ हे ऐकून आजींनी घाईघाईत मोबाइल ठेवत हातातली पिशवी मुठीत आवळली आणि रस्त्याच्या पलीकडे तरातरा निघून गेल्या.नेत्यांची संख्या वाढते तेव्हा...चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीचा कायदा झाला, अन् राज्यात दारूबंदी करण्याची मागणी जोर धरू लागली. अशात दारूबंदी मागणीच्या नावावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी टुकार संघटनाही पुढे येऊ लागल्या. अशाच एका संघटनेने संपूर्ण राज्यात दारूबंदी करण्याची मागणी करीत आझाद मैदानात धरणे आंदोलनाचा कार्यक्रम आखला. सर्व प्रसारमाध्यमांना तशा आशयाचे फॅक्सही धाडले. मात्र प्रत्यक्षात आंदोलनाच्या दिवशी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशिवाय एकही कार्यकर्ता आझाद मैदानात फिरकला नाही. त्यामुळे व्यासपीठावर ढीगभर नेते आणि व्यासपीठासमोर एकही कार्यकर्ता नाही, अशी लाजिरवाणी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र निर्लज्जपणाचा कळस गाठलेल्या या संघटनेचा एकही पदाधिकारी कार्यकर्त्याची भूमिका घेऊन व्यासपीठासमोर बसायला तयार नव्हता. प्रत्येक जण माईकचा ताबा घेऊन जोरदार भाषण ठोकण्यात गुंतला होता. त्या वेळी समोर ऐकण्यासाठी एकही कार्यकर्ता नव्हता त्यामुळे नेमके भाषण कोणासाठी सुरू आहे, त्याचाच पत्ता लागत नव्हता. मैदानासमोरून जाणारे लोकही या परिस्थितीकडे पाहून हसावे की रडावे, अशा कात्रीत सापडले नसतील तर नवलच...सफरचंदाचे स्टीकर! फळबाजारात बाराही महिने सफरचंदांची आवक होत असते. ही लालभडक सफरचंदे विकत घेण्याचा मोह अनेकांना आवरत नाही. त्यातच रोज एक सफरचंद खाणे आरोग्याला चांगले असते, असे डॉक्टर नेहमी सांगतात. साहजिकच सफरचंद खरेदी करण्याकडे सर्वसामान्यांचा कल असतो. आजकाल काही स्टीकर डकवलेली सफरचंदे विक्रे त्यांकडे मांडलेली बघायला मिळतात. इम्पोर्टेड सफरचंदे असे त्या स्टीकरमधून विक्रे त्याला सुचवायचे असते. त्या दिवशी मात्र एक जण दुसऱ्याला सांगत होता, की त्या स्टीकरवर बोटाने थोडे दाबून बघ. दुसऱ्याने ही कृती लगेच अंमलात आणल्यावर त्याचे बोट स्टीकरवरून आत दबले गेले. स्टीकरमागचे हे गौडबंगाल उमगल्यावर त्याने हातात घेतलेली सफरचंदे पुन्हा टोपलीत टाकली. नंतर मात्र त्याने या इम्पोर्टेड सफरचंदांवरून त्या विक्रेत्याला फैलावर घेतले.