Join us  

वाधवा बंधूंची जामिनावर सुटका; तरीही कारागृहातच राहावे लागणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 4:10 AM

या दोघांची जामिनावर सुटका झाली असली तरी सीबीआयने नोंदविलेल्या गुन्ह्याप्रकरणी या दोघांना कारागृहातच राहावे लागणार आहे.

मुंबई : येस बँक घोटाळ्याप्रकरणी आरोपी असलेले डीएचएफएलचे प्रवर्तक कपिल वाधवा व धीरज वाधवा यांच्यावर दोषारोपपत्र दाखल करण्यास सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) विलंब झाल्याने उच्च न्यायालयाने गुरुवारी या दोघांची जामिनावर सुटका केली. या दोघांची जामिनावर सुटका झाली असली तरी सीबीआयने नोंदविलेल्या गुन्ह्याप्रकरणी या दोघांना कारागृहातच राहावे लागणार आहे.ईडीने या दोघांवर मनी लॉन्ड्रिंंग अ‍ॅक्टअंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. ईडी या प्रकरणी ६० दिवसांत दोषारोपपत्र दाखल करण्यात अपयशी ठरली, असे म्हणत न्या. भारती डांगरे यांनी वाधवा बंधूंची जामिनावर सुटका केली. कायद्यात नमूद करण्यात आलेल्या मुदतीत आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले नाही तर आरोपी जामिनास पात्र आहे, असे म्हणत न्या. डांगरे यांनी कपिल व धीरज वाधवा यांना प्रत्येकी एक लाख रुपये जातमुचलका भरण्याचे निर्देश दिले. तसेच त्या दोघांनाही पोलिसांकडे पासपोर्ट जमा करण्याचे निर्देश दिले.ईडीतर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी न्यायालयाला या आदेशावर दोन आठवड्यांची स्थगिती देण्याची विनंती केली. जेणेकरून सर्वोच्च न्यायालयात या निर्णयाला आव्हान देता येईल. कारवाईला सुरुवात कुठून करायची आणि कुठे संपवायची, याला शेवट नाही. परंतु, तपास पूर्ण करण्यात आला नाही आणि दोषारोपपत्र दाखल केले नाही तर आरोपीची जामिनावर सुटका केली जाऊ शकते, असे न्यायालयाने म्हटले. त्यांची उच्च न्यायालयाकडून जामिनावर सुटका करण्यात आली असली तरी सीबीआयने नोंदविलेल्या गुन्ह्याप्रकरणी या दोघांना कारागृहातच राहावे लागणार आहे.वाधवा बंधूंना १४ मे रोजी अटक करण्यात आली. ईडीने १५ जुलै रोजी वाधवा, येस बँकेचा संस्थापक राणा कपूर, त्याच्या मुली रोशनी, रेखा आणि सीएविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले आहे. ७ मार्च रोजी सीबीआयने याप्रकरणी गुन्हा नोंदविल्यावर ईडीने वाधवा यांच्यावर कारवाई करण्यास सुरुवात केली. डीएचएफलला कर्ज देऊन राणा कपूर याला डीएचएफलकडून ६०० कोटी रुपयांची लाच मिळाली, असे सीबीआय व ईडीचे म्हणणे आहे.