Join us  

वडाळा कोठडी मृत्यू प्रकरण: 'पोलिसांवर हत्या केल्याचा आरोप करण्याइतपत पुरावे नाहीत'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2019 3:36 AM

सीबीआयची न्यायालयाला माहिती

मुंबई : पंचवीस वर्षीय तरुणाची छळवणूक केल्याचा आरोप असलेल्या आठ पोलिसांवर त्या तरुणाची हत्या केल्याचा गुन्हा नोंदविण्याइतपत पुरावे नाहीत, अशी माहिती सीबीआयने उच्च न्यायालयाला गुरुवारी दिली.२०१४ मध्ये वडाळा पोलिसांनी चोरीच्या आरोपातील २५ वर्षीय अँजेलो वल्दारीस याची पोलीस कोठडीत मानसिक व शारीरिक छळवणूक केली. त्याला दंडाधिकारी न्यायालयात नेत असताना त्याने पोलिसांच्या हातून निसटण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात तो बाजूने भरधाव जात असलेल्या लोकलला धडकला आणि त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती सीबीआयने न्या. बी.पी. धर्माधिकारी व न्या. साधना जाधव यांच्या खंडपीठाला दिली.आरोपी पोलिसांवर भारतीय दंडसंहिता कलम ३०२ (हत्या) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात यावा, यासाठी पीडित अँजेलो वल्दारीस याच्या वडिलांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणीत सीबीआयने वरील माहिती न्यायालयाला दिली.‘कोठडी मृत्यूप्रकरणी सखोल तपास केल्यानंतर व पुरावे गोळा केल्यानंतर, त्यात साक्षी, वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आणि न्यायवैद्यकीय अहवाल हे सर्व विचारात घेऊन या पोलिसांवर आयपीसी ३०२ अंतर्गत गुन्हा नोंदविला जाऊ शकत नाही, असा निष्कर्ष सीबीआयने काढला,’ असे सीबीआयचे वकील हितेन वेणेगावकर यांनी सांगितले.उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशामुळे सीबीआयने आरोपी पोलिसांवर आयपीसी कलम ३७७ अंतर्गत गुन्हा नोंदविला, अशी माहिती याचिकाकर्त्यांची वकील पायोशी रॉय यांनी न्यायालयाला दिली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर उच्च न्यायालयाने या याचिकेवरील निर्णय ठेवला.