Join us

मतदारांनी नऊ आमदारांना घरी बसवले!

By admin | Updated: October 22, 2014 00:07 IST

जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्यासह नऊ आमदारांना मतदारांनी घरी बसवले आहे. त्यांच्या जागी नव्यांना संधी दिली आहे

सुरेश लोखंडे, ठाणेजिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्यासह नऊ आमदारांना मतदारांनी घरी बसवले आहे. त्यांच्या जागी नव्यांना संधी दिली आहे. उर्वरित नऊ आमदारांना पुन्हा सेवेची संधी मिळाली आहे. पण, काँग्रेसची एकही जागा निवडून न आल्यामुळे त्यांचे पानिपत झाले आहे. जिल्ह्यातील १८ आमदारांपैकी सर्वाधिक भाजपाचे ७ आमदार विजयी झाले असून शिवसेनेचे ६ आमदार तर राष्ट्रवादीचे ४ आणि अपक्ष आमदार गणपत गायकवाड विजयी झाले आहेत. यातील आता भाजपातून निवडून आलेल्या विद्यमान आमदारांमध्ये किसन कथोरेंसह रवींद्र चव्हाण पुन्हा विजयी झाले आहेत. याशिवाय, शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंसह प्रताप सरनाईक, बालाजी किणीकर आणि रूपेश म्हात्रे दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत. राष्ट्रवादीचे विद्यमान जितेंद्र आव्हाडांसह संदीप नाईक यांनाही पुन्हा सेवेची संधी मिळाली आहे. माजी पालकमंत्री राष्ट्रवादी काँग्र्रेसचे गणेश नाईक यांचा पराभव बेलापूर मतदारसंघातून भाजपाची उमेदवारी मिळवलेल्या मंदा म्हात्रे यांनी केला आहे. भिवंडी ग्रामीण मतदारसंघाची भाजपाची जागा आता शिवसेनेने घेतली आहे. शिवसेनेचे राजन विचारे खासदार झाल्यामुळे ठाणे मतदारसंघातून सेनेचा उमेदवार विजयी होणे अपेक्षित होते. पण, तेथे भाजपाचे संजय केळकर विजयी झाले आहेत. २००९ च्या विधानसभा निवडणुकीला २४ पैकी सर्वाधिक शिवसेनेने ५ जागा जिंकल्या होत्या. भिवंडी (पूर्व) मध्ये अबू आझमी विजयी झाले असता ते मानखुर्द येथेही निवडून आले होते. यामुळे त्यांनी भिवंडी पूर्वच्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. यामुळे या जागेसाठी निवडणूक झाली असता सेनेचे रूपेश म्हात्रे निवडून आल्यामुळे सेनेच्या आमदारांची संख्या ६ झाली. एनसीपी, भाजपा यांच्या प्रत्येकी चार आमदारांसह मनसे, बहुजन विकास आघाडी आणि अपक्ष यांचे प्रत्येकी दोन आमदार विजयी झाले होते, तर सीपीएमचा एक आमदार होता. काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र गावित पालघरमधून निवडून आले होते. या वेळी पालघर व ठाणे या दोन्ही जिल्ह्यांतून काँग्रेसचा एकही उमेदवार निवडून आला नाही.