मुंबई : २०१२ साली मुंबई महानगरपालिका निवडणुकांमध्ये केवळ ४५ टक्के मतदानाची नोंद झाली होती. त्यामुळे आता तरी नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घरातून बाहेर पडावे, यासाठी मुंबईच्या महाविद्यालयीन तरुणाईने पुढाकार घेतला आहे. मुंबईतील काही महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी ‘व्होट फॉर मुंबई’ हे अभियान सुरू केले आहे. या अभियानाला मुंबईकरांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.मुंबईतील एच.आर. महाविद्यालय, जयहिंद महाविद्यालय, मिठीबाई महाविद्यालय, विवेकानंद महाविद्यालय या संस्थांनी यात सहभाग नोंदविला आहे. ‘व्होट फॉर मुंबई’ अभियानाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे, या माध्यमातून नवमतदारांपर्यंत पोहोचून त्यांना मतदानाचे महत्त्व पटवून देणे. त्यांच्या मनातील ‘राजकारणा’चा द्वेष बाजूला सारून मतदानाच्या जबाबदारीची जाणीव करून देणे हे आहे. शिवाय, त्याचबरोबर उरलेल्या ५२ टक्के मतदारांपर्यंत पोहोचण्याचे ध्येयही बाळगले आहे.‘व्होट फॉर मुंबई’च्या माध्यमातून मुंबईकर मतदारांना ‘मी मतदान करणार’ अशी प्रतिज्ञा घेण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. तसेच, शहर-उपनगरातही महाविद्यालये, कार्यालये, टॅक्सी संघटना, रेल्वे स्थानक, निवासी वसाहत अशा सर्व घटकांत जनजागृती करण्यात येत आहे. फेसबुक, टिष्ट्वटर, यु-ट्युब आणि व्हॉट्सअॅप सर्व सोशल मीडियावरही या अभियानाची जनजागृती करण्यात येत आहे.
मतदान जनजागृतीसाठी तरुणाई सरसावली!
By admin | Updated: February 17, 2017 02:33 IST