Join us  

शोषितांचा आवाज शांत झाला!; प्रा. पुष्पा भावे यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2020 3:19 AM

Pushpa Bhave रूढार्थाने मराठीच्या प्राध्यापिका आणि विद्यार्थिप्रिय शिक्षक या नात्याने अध्यापन क्षेत्रात कार्यरत असताना क्रियाशील स्वभावामुळे त्या सातत्याने समाजाशी जोडल्या गेल्या.

मुंबई/पुणे : ज्येष्ठ नाट्य समीक्षक, विचारवंत, प्रभावी वक्त्या, सामाजिक कार्यकर्त्या प्रा. पुष्पा भावे यांच्या निधनाने परिवर्तनवादी चळवळींचा खंदा आधार हरपला. खंबीर स्त्रीवादी कार्यकर्त्या आणि शोषितांचा आवाज शांत झाला, अशा भावना व्यक्त होत आहेत.रूढार्थाने मराठीच्या प्राध्यापिका आणि विद्यार्थिप्रिय शिक्षक या नात्याने अध्यापन क्षेत्रात कार्यरत असताना क्रियाशील स्वभावामुळे त्या सातत्याने समाजाशी जोडल्या गेल्या. स्वातंत्र्योत्तर काळात महागाईविरोधी आंदोलनात अहिल्याताई रांगणेकर, मृणाल गोरे यांच्यासमवेत त्या लाटणे मोर्चात हिरिरीने सहभागी झाल्या होत्या. मुंबईतील गिरणी कामगार संघर्ष समितीच्या चळवळीला वैचारिक मार्गदर्शन करण्यापासून कामगारांना हक्काचे घर मिळावे यासाठी सरकारविरोधी आवाज उठवण्यात त्या अग्रभागी होत्या.किणी प्रकरण पुढे आणण्यात त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या निधनाने सामाजिक चळवळीची खूप मोठी हानी झाल्याची भावना ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी व्यक्त केली. आमच्या पिढीचे वैचारिक पोषण करण्याचे काम पुष्पातार्इंनी केले, असे सुनीती सु. र म्हणाल्या. महिला आरक्षणाच्या मुद्द्यामुळे महिलांचे मूळ प्रश्न बाजूला पडले आहेत, हे त्यांनी ठामपणे मांडण्याचे धाडस दाखविले, असे ‘युक्रांद’चे कुमार सप्तर्षी यांनी सांगितले. राज्य नाट्य स्पर्धेत आम्ही आणीबाणीविरोधात ‘जुलूस’ हे एक नाटक केले होते. सरकारी मंचावरून सरकारच्या विरोधात नाटक करायचे अशी एक वेगळीच ती किक होती, अशा आठवणी ज्येष्ठ अभिनेते व दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी जागविल्या.

टॅग्स :पुषा भावे