Join us

विनामास्क फिरल्याने होणार विवेक ओबेरॉयला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयला विनाहेल्मेट बाइक चालविल्या प्रकरणी ५०० रुपयांचे ई-चलान मोबाइलवर पाठविण्यात आले. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयला विनाहेल्मेट बाइक चालविल्या प्रकरणी ५०० रुपयांचे ई-चलान मोबाइलवर पाठविण्यात आले. सध्या मुंबईबाहेर असलेल्या या अभिनेत्यावर परतल्यानंतरही विनामास्क फिरून कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याबाबत अटकेची कारवाई करण्यात येणार आहे.

विवेकने विनामास्क व विनाहेल्मेट फिरल्याबाबत पोलिसांची माफी मागितली होती. त्याच्यावर जुहू पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, सध्या तो दिल्लीत आहे. त्यामुळे ताे मुंबईत परतल्यावर जुहू पोलीस त्याच्यावर अटकेची कारवाई करतील. ‘विवेकने केलेला गुन्हा जामीनपात्र असून, त्यानुसार त्याच्यावर कारवाई केली जाईल,’ अशी माहिती एका वरिष्ठ पाेलीस अधिकाऱ्यांनी दिली.

विवेकने नुकताच एक व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. ताे त्याने ‘पावरी हो रही है’ या स्टाईलमध्ये काढला आहे. व्हिडीओत विवेक आधी स्वत:ला दाखवतो, नंतर त्याची बाइक आणि मग त्याचे चलान दाखवतो आणि पुढे म्हणतो, ‘हा मी आहे, ही माझी बाइक आहे आणि माझे चलान कापले आहे. ‘मुंबई पोलीस हे तुमच्यासाठी’ अशा आशयाचे कॅप्शन त्याने या व्हिडीओला दिले आहे.

चलान कापल्यानंतर त्याने ‘प्यार हमें किस मोड पे ले आया! मी आणि माझे प्रेम नवीन बाइकवर फिरायला गेलो, विनाहेल्मेट बाइक चालविल्याने आमचे चलान कापले आहे. विनाहेल्मेट बाइक चालविल्यावर मुंबई पोलीस पकडणार. सुरक्षा किती महत्त्वाची आहे याची जाणीव करून देणार, मुंबई पोलिसांचे आभार. सुरक्षित राहा, हेल्मेट आणि मास्क वापरा!’ अशा आशयाचे ट्विट केले आहे.

१४ फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डेला विवेक बाइकवर पत्नीसोबत फिरत होता. तेव्हा त्याने हेल्मेट घातले नव्हते. मास्कही नव्हते. हा व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आणि सगळा प्रकार उघड झाला.

......................