मोखाडा : आदिवासीबहुल असलेल्या मोखाडा तालुक्यातील आरोग्य विभागाची या दळभद्री अवस्था काही सुधारत नाहीत. बालकांना अगदी स्वस्तात उपलब्ध होणाऱ्या व अत्यंत गरजेचे असणाऱ्या व्हिटॅमीन ए म्हणजे अ जीवनसत्त्वाचे डोसच मोखाडा तालुक्यात डिसेंबरपासून उपलब्ध नाही. त्यामुळे अ जीवनसत्वाअभावी होणाऱ्या रात आंधळेपणा, अतिसार अशा विविध आजारांचा धोका वाढण्याची शक्यता आहे. पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भाग हा ९९ टक्के आदिवासी असलेला भाग आहे. या ठिकाणी कुपोषण संपता संपत नाही. अशा परिस्थितीत बालकांची प्रतिकार शक्ती वाढावी यासाठी अ जीवनसत्वाची मोठ्याप्रमाणावर आवश्यकता असते. विशेषकरून ताजा भाजीपाला, कडधान्य यांच्या नियमित सेवनाने अ जीवनसत्व मोठ्या प्रमाणात मिळते. मात्र रोजगाराअभावी दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असलेल्या आदिवासी बांधवांना रोजच भाजीपाला, कडधान्य खाणे शक्य नाही.यामुळे मुले जन्माला आल्यानंतर नऊ महिन्यानंतर अ जीवनसत्वाचा डोस त्यानंतर दीड वर्षाने दुसरा डोस आणि पाच वर्षापर्यंत दर सहा महिन्यांनी एक डोस याप्रमाणे हा डोस दिला जातो. (वार्ताहर)
‘व्हिटॅमिन ए’ची मोखाड्यात टंचाई
By admin | Updated: March 8, 2015 22:45 IST