Join us  

दबंग महिला रिक्षाचालकाची कथा फेसबुकवर ‘व्हायरल’

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2019 4:07 AM

शिरीन अकरा वर्षांच्या असताना आई-वडिलांचा घटस्फोट झाला. आईने पुन्हा विवाह केला.

शिरीन अकरा वर्षांच्या असताना आई-वडिलांचा घटस्फोट झाला. आईने पुन्हा विवाह केला. आईला तिचे स्वत:चे आयुष्य जगायचे होते, मात्र लोकांना ते कसे सहन होणार? दुसऱ्या विवाहानंतर काही महिन्यांनी आई आणि भाऊ बाहेर गेले होते. लोक जमा झाले. काही लोकांनी आईला टोमणे मारले. दुसºया विवाहाचा विषय उकरून तिच्या चरित्र्यावरच संशय व्यक्त केला. शिरीन लिहितात, आईला ते सहन झाले नाही. त्याच रात्री पेटवून घेऊन तिने आत्महत्या केली. आई गमावणे हा मला मोठाच धक्का होता. पण पुढची संकटे इथेच संपली नाहीत. एका वर्षाने वडिलांनी माझा आणि बहिणीचा विवाह करवून दिला. बहिणीच्या सासरच्यांनी तिला हुंड्यासाठी त्रास दिला. ती गर्भवती असताना विष देऊन तिला संपविले. ज्यांच्यावर माझे खूप प्रेम होते, त्यांनाच मी गमावून बसले.आपणही जगू शकणार नाही, असे मला वाटू लागले. मात्र मुलाने जन्म घेतला, तेव्हा माझ्याकडे त्या निष्पाप जीवासाठी खंबीर पावले टाकणे भाग होते. त्याशिवाय पर्यायच नव्हता. पण तिसºया मुलानंतर पतीने साथ सोडली. पतीने तीन वेळा तलाक म्हटल्यावर मुले घेऊन घर सोडावे लागले. अक्षरश: रस्त्यावर यावे लागले.शिरीन लिहितात, मुलांचे पोट भरण्याचे आव्हान होते. बिर्याणी विक्रीचा छोटासा स्टॉल लावला. पालिकेने त्याच्यावर कारवाई केली. काहीही पर्याय नसताना जी काही पुंजी शिल्लक होती, ती खर्च करून रिक्षा खरेदी केली. ती चालविल्यानंतर चांगली कमाई होऊ लागली. मात्र दुसरे रिक्षावाले जाणूनबुजून वाईट वागत. पण हळूहळू घरखर्च भागेल इतकी कमाई करू लागले.एक वर्ष झाले, स्व: कमाईतून मी घर चालवत आहे. मुले जे काही मागतात, ते त्यांना देऊ शकते. प्रवाशांनाही माझे धाडस पाहून भरून येते. काही जण मला पाहून टाळ्या वाजवितात, चांगली टिप देतात, काही प्रेमाने आलिंगन देतात.शिरीन लिहितात, एक प्रवासी रिक्षात बसला. मी महिला आहे, हे त्याला जाणवले नाही. त्याने मला ‘भय्या’ या शब्दाने संबोधले. पण जेव्हा त्याने मला पाहिले, तेव्हा मी दबंग महिला आहे, अशी त्याची प्रतिक्रिया होती.।काही वेळा शौर्याच्या, हिमतीच्या काही कथा आपल्याही हृदयाला स्पर्शून जातात. आपल्याही आयुष्यावर प्रभाव टाकतात. मुंबईतील एका मुस्लीम महिलेची कथा काहीशी अशीच आहे. तिची जीवनकथा, संघर्ष फेसबुकवर व्हायरल होत आहे. शिरीन असे तिचे नाव असून ती आॅटो रिक्षाचालक आहे. ‘ह्यूमन आॅफ बॉम्बे’ नामक पेजमध्ये तिच्या आयुष्याची कथा रेखाटण्यात आली आहे. शिरीन म्हणतात की, गरीब आणि रुढीवादी मुस्लीम परिवारात जन्म झाल्यानंतरही आपण स्वत:च्या पायावर उभे राहिलो.