Join us  

....अपघातानंतर विनायक मेटे यांच्यावर उपचारास म्हणून झाला विलंब; फडणवीसांनी दिली सभागृहाला माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2022 6:05 AM

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या गाडीला अपघात झाल्यानंतर ड्रायव्हरने जेव्हा ११२ क्रमांकावर मदतीसाठी फोन केला तेव्हा नवी मुंबई पोलीस मदतीसाठी तातडीने निघाले होते.

मुंबई :

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या गाडीला अपघात झाल्यानंतर ड्रायव्हरने जेव्हा ११२ क्रमांकावर मदतीसाठी फोन केला तेव्हा नवी मुंबई पोलीस मदतीसाठी तातडीने निघाले होते. पण धक्क्यामुळे चालक काहीसा गोंधळला आणि त्याला अपघाताचे नक्की लोकेशन सांगता आले नाही. आम्ही पनवेलजवळ आहोत, इतकेच तो सांगू शकला. अशा परिस्थितीत नवी मुंबई पोलिसांनी बराच शोध घेतला. त्यानंतर रायगड पोलिसांनाही माहिती दिली.

रायगड पोलीसही मदतीसाठी निघाले होते. या दरम्यान एक्स्प्रेस वेचे व्यवस्थापन पाहणाऱ्या आयआरबी कंपनीला अपघाताची माहिती मिळाली. त्यांची मदत लगेच तिथे पोहोचली, पण दुर्देवाने रुग्णालयात पोहोचेपर्यंत मेटे यांचे निधन झाले होते, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत दिली.

मेटे यांच्या अपघाती मृत्यूबद्दल त्यांच्या कुटुंबियांसह अनेकांकडून शंका व्यक्त केल्या जात असून त्यांचे निरसन होण्यासाठी या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. मेटे यांच्या पत्नी ज्योतीताई यांनीही काही शंका उपस्थित केल्या आहेत. मेटेंचा वाहनचालकही सातत्याने जबाब बदलत आहे. या पार्श्वभूमीवर विनायक मेटे यांच्या अपघाताची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. त्यावर मेटे यांच्या अपघाताचा घटनाक्रम आणि त्यांच्यावर उपचारासाठी विलंबाची कारणे याची सविस्तर माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली.

मुंबई-पुणे मार्गावरील अपघातस्थळांचा शोध घेऊन तेथील त्रुटी सुधारण्याचे काम सुरु आहे. अपर पोलिस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करुन त्यांना पोलिसांच्या प्रतिसाद व बचाव कार्यवाहीतील त्रूटी दूर करुन प्रशासकीय सुधारणा सुचविण्यास सांगण्यात येईल, असे आश्वासनही फडणवीस यांनी पवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर दिले.

एक्स्प्रेस वेवर आयटीएमएसचा वापर करणार- राज्य सरकार मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर आयटीएमएस म्हणजेच  इंटेलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिमचा वापर करण्याच्या विचारात आहे. तसे झाल्यास एक्स्प्रेस वेवर होत असलेल्या हालचालींवर योग्य पद्धतीने लक्ष ठेवणे सोयीचे होईल. त्याशिवाय ११२ क्रमांकावर जेव्हा कोणताही व्यक्ती मदतीसाठी फोन करेल त्यावेळी तो मोबाईलवरूनच  फोन करेल हे गृहीत धरून थेट त्या व्यक्तीच्या फोनचे लोकेशन पोलिसांना कळेल, अशी व्यवस्था लवकरच करण्याचा विचार सुरू असल्याचे आश्वासन फडणवीस यांनी दिले.- मेटे यांच्या अपघाती मृत्यूची चौकशी सरकारने सुरू केली आहे, पण या मार्गावर अपघात होऊ नयेत म्हणून सरकार काय करणार असा सवाल काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी केला. त्याला फडणवीस यांनी हे उत्तर दिले.

चालकाच्या चुकीमुळेच झाला अपघात शेवटच्या लेनमधून चालणारा ट्रॉलर मधल्या लेनमधून चालत होता. त्यामुळे विनायक मेटेंच्या चालकाला ओव्हरटेक करायला जागा मिळत नव्हती. काही काळ ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केल्यानंतर ड्रायव्हर तिसऱ्या लेनमध्ये गेला. तिसऱ्या लेनमधूनही ओव्हरटेक करण्या त्याने प्रयत्न केला मात्र, पुढे एक वाहन होते. या दोन वाहनांच्यामध्ये जी जागा होती त्या जागेतून ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न मेटेंच्या चालकाने केला. आणि त्या नादात  मेटे ज्या बाजूला बसले होते त्या बाजूला जोरात धडक बसल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

आमदारांच्या वाहन चालकांना प्रशिक्षण- शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या अपघाती निधनानंतर सरकारने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार विधिमंडळाच्या सर्व आमदारांच्या वाहनचालकांना मुंबईत विशेष प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. - येत्या बुधवारी म्हणजेच २४ ऑगस्ट रोजी हे प्रशिक्षण घेण्यात येणार असल्याची घोषणा विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सोमवारी विधानसभेत केली. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत हे प्रशिक्षण असेल, अशी माहिती नार्वेकर यांनी दिली.

टॅग्स :विनायक मेटे