Join us

वाढवणमध्ये सर्व्हेसाठी आलेल्या पथकाला ग्रामस्थांचा घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:18 IST

डहाणू : वाढवण येथे होऊ घातलेल्या बंदराला विरोध करण्यासाठी गुरुवारी सकाळपासून हजारोंच्या संख्येने ग्रामस्थ रस्त्यावर उतरले आणि जैवविविधतेचा सर्व्हे ...

डहाणू : वाढवण येथे होऊ घातलेल्या बंदराला विरोध करण्यासाठी गुरुवारी सकाळपासून हजारोंच्या संख्येने ग्रामस्थ रस्त्यावर उतरले आणि जैवविविधतेचा सर्व्हे करण्यासाठी आलेल्या जेएनपीटीच्या अधिकाऱ्यांच्या वाहनाला घेराव घालून जाब विचारला. या वेळी संतप्त ग्रामस्थांनी वैज्ञानिकांनी रिसर्च करण्यासाठी घेतलेले पाणी, माती, खडक, वाळू तसेच झाडपानाचे नमुने फेकून दिले. या वेळी वाढवण बंदर हटावचे फलक घेऊन निदर्शने करण्यात आली. या वेळी घोषणाबाजीने वातावरण तंग झाले होते.

वाढवण गावात बंदराच्या सर्व्हेसाठी वैज्ञानिक येणार म्हणून प्रचंड पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. गुरुवारी भल्या पहाटेपासून राष्ट्रीय समुद्र वैज्ञानिक संस्थेचे वरिष्ठ वैज्ञानिक राकेश पी.एस., सोनिया सुकुमारन तसेच जेएनपीटीचे राजेश वगळ हे खासगी वाहनातून आडमार्गाने पोहोचले. याची कुणकुण लोकांना लागली आणि ते परत येत असताना त्यांची गाडी अडवली. त्यांच्याकडे कोणतीही परवानगी नव्हती. त्यामुळे जमाव अधिकच संतप्त झाला. अखेर अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रकाश गायकवाड यांच्या मध्यस्थीने जमाव शांत झाला.

या वेळी सामील असलेल्या सर्व संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत वाणगाव पोलीस ठाण्यात बैठक घेण्यात येऊन वैज्ञानिकांवर आणि जेएनपीटी अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार देण्यात आली. दरम्यान, आज जिल्हाभरातील पोलीस अधिकारी, राज्य राखीव फोर्सबरोबरच पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने बंदोबस्तासाठी आले होते. पालघर जिल्ह्याचे ॲडिशनल एसपी प्रकाश गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वास वळवी जमावाला शांत करण्याचा वारंवार प्रयत्न करीत होते. मात्र संतप्त ग्रामस्थ कुणाचे ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. यात महिला आघाडीवर होत्या. अखेर वाढवण समुद्रकिनाऱ्यापासून मोठ्या पोलीस बंदोबस्तात सर्व्हे करणाऱ्या पथकाला वरोरपर्यंत सुरक्षित आणण्यात पोलिसांना यश आले.

फोटो : जैवविविधतेच्या सर्व्हेसाठी आलेल्या वैज्ञानिकांच्या पथकाला घेराव घालताना ग्रामस्थ.