वैभववाडी : वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीसाठी चुरशीने शांततेत ८९.५२ टक्के इतके विक्रमी मतदान झाले. प्रभाग पाचमध्ये सर्वाधिक ९६.९७ तर १३ मध्ये सर्वात कमी ८३. ८७ टक्के मतदान झाले. पोलीस प्रशासनाने ठेवलेल्या चोख बंदोबस्तामुळे मतदान प्रक्रियेदरम्यान कोणताही गैरप्रकार घडू शकला नाही. विविध राजकीय पक्षांच्या दिग्गजांच्या उत्तराधिकाऱ्यांचे राजकीय भवितव्य ठरविणाऱ्या या निवडणुकीत चुरशीने मतदान सुरू होते. दुपारी दीडपर्यंत ७५ टक्के मतदान झाले होते. शिवसेना नेते जयेंद्र रावराणे, माजी सभापती अरविंद रावराणे यांचे सुपुत्र तसेच वैभववाडीतील जेष्ठ नेते सज्जनराव रावराणे, विधानसभा मतदारसंघ युवक काँग्रेस अध्यक्ष प्रफुल्ल रावराणे यांच्या सौभाग्यवती निवडणुकीच्या रिंगणात असल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. तसेच आमदार नीतेश राणे यांनी ठाण मांडल्यामुळे निवडणुकीला महत्त्व आले आहे. मतदान काळात शिवसेना खासदार विनायक राऊत, आमदार नीतेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक, माजी आमदार प्रमोद जठार, जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत आदींनी मतदान केंद्रावर भेटी दिल्या. तसेच निवडणूक निरीक्षक रवींद्र्र सावळकर, निवडणूक निर्णय अधिकारी संतोष भिसे, पोलीस उपअधीक्षक पद्मजा चव्हाण यांनी मतदान केंद्रांना भेटी दिल्या. मतदान पुढीलप्रमाणे :- प्रभाग १ - ८४.0७, प्रभाग २ - ८६.८१, प्रभाग ४ - ९३.८१, प्रभाग ५ - ९६.९७ , प्रभाग ६ - ८९. ५२, प्रभाग ८ - ८८. 0४ , प्रभाग ९ - ९0.00 , प्रभाग १0 - ८९. ५३, प्रभाग ११ - ८८.४६, प्रभाग १२ - ८७ .३४, प्रभाग १३ - ८३.८७, प्रभाग १४ - ९५. ६५, प्रभाग १७ - ८९. ३९ मतदान झाले आहे. (प्रतिनिधी)
सातजणांची चौकशी मतदान केंद्राच्या परिसरात संशयास्पद फिरणाऱ्या शशिकांत रमेश परब (मुंबई), गणेश सदानंद हळवे (फोंडा), विजय भीमराव कांबळे (मुलुंड), चंद्रकांत सीताराम वारंग, सूर्यकांत सीताराम वारंग, संजय हरिश्चंद्र वारंग ( सर्व रा. मुंबई मूळ गाव करुळ), नीलेश मुरारी शिंदे (सोनाळी) यांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन सोडून दिले तर माजी सभापती संदेश सावंत यांचे वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले होते.