Join us

विक्रोळीत घरफोड्या वाढल्या

By admin | Updated: May 18, 2015 05:12 IST

विक्रोळी परिसरात गेल्या दीड महिन्यात झालेल्या पाच घरफोड्यांमुळे विक्रोळीकर धास्तावले आहेत. प्रशासनाने जर वेळीच याची दाखल घेतली नाही तर

मुंबई : विक्रोळी परिसरात गेल्या दीड महिन्यात झालेल्या पाच घरफोड्यांमुळे विक्रोळीकर धास्तावले आहेत. प्रशासनाने जर वेळीच याची दाखल घेतली नाही तर पोलीस ठाण्यावर मोर्चा नेऊ, असा इशाराही विक्रोळीकरांनी दिला आहे. कन्नमवारनगर-२ मधील २४१ क्रमांकाच्या इमारतीत राहणारे नरेंद्र चव्हाण नातेवाइकांना भेटण्यासाठी बाहेर गेले असता संधी साधून घरफोड्यांनी त्यांच्या घरातील ३ लाख १० हजार रुपये किमतीचा ऐवज घेऊन पळ काढला. सकाळी घरी परतलेल्या चव्हाण कुटुंबीयांना घरातील ऐवज चोरीला गेल्याचे समजले. त्यांनी तत्काळ विक्रोळी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्याच रात्री इमारत क्रमांक २३२ मध्ये राहणारे दीपक सावर्डेकर यांच्या घरातून साडेतीन लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. यापूर्वी ७ एप्रिल रोजी सागर मोरजे यांच्या घरातून ३ लाख ४८ हजार तर रोहिणी मकासरे यांचे घरही फोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला होता. मात्र मकासरे यांचा ऐवज गुप्त ठिकाणी ठेवल्यामुळे चोरट्यांच्या हाती काहीही लागले नाही. त्याच परिसरात राहणारे उगाडे आणि गवांदे यांचेही घर फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. एकापाठोपाठ घडत असलेल्या या घटनांमुळे रहिवाशांना घर बंद करून बाहेर पडणे भीतीदायक झाल्याचे नरेंद्र चव्हाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. याबाबत वारंवार तक्रार करूनही पोलीस लक्ष देत नसल्याची खंत सामाजिक कार्यकर्ते ज्ञानदेव ससाणे यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)