Join us  

जामीन अर्जावरील सुनावणीचे होणार व्हिडीओ रेकॉर्डिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2019 1:59 AM

उच्च न्यायालयाचा आदेश : डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण

मुंबई : डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी आरोप असलेल्या तीन डॉक्टरांच्या जामीन अर्जावरील सुनावणीचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करा, असा आदेश उच्च न्यायालयाने गुरुवारी रजिस्ट्री विभागाला दिला. डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती मेहरे व डॉ. अंकिता खंडेलवाल यांनी जामिनासाठी केलेल्या याचिकेवरील सुनावणी न्या. डी. एस. नायडू यांच्या एकसदस्यीय खंडपीठापुढे होती.

२२ मे रोजी पायल तडवीने नायर रुग्णालयाच्या हॉस्टेलमधील रूमवर आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येला हेमा आहुजा, भक्ती मेहरे, अंकिता खंडेलवाल जबाबदार असल्याचे तिचे कुटुंब आणि पोलिसांचे म्हणणे आहे. या तिन्ही डॉक्टर तिच्याबाबत जातिवाचक टिप्पणी करून तिचा रुग्णालयाचे कर्मचारी आणि रुग्णांसमोर अपमान करत. तसेच तिला कारकुनीचे काम करण्यास सांगत. त्यांच्या छळाला कंटाळून पायल तडवीने आत्महत्या केली.

अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायद्याचे कलम १५ (ए) (१०) अंतर्गत या कायद्याशी संबंधित नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्यांचा खटला व अन्य सर्व कारवाईचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करणे बंधनकारक केले आहे. न्या. नायडू यांनी याची दखल घेत म्हटले की, आरोपींच्या जामिनावर सुनावणी घेण्यास विलंब होत आहे, हे मी जाणतो. पण कायद्याने बंधनकारक बाबींकडे मी दुर्लक्ष करू शकत नाही.

न्यायालयाने रजिस्ट्री विभागाला ३० जूनपर्यंत जामीन याचिकांवरील सुनावणीचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्यासाठी आवश्यक ती व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. अशा महत्त्वाच्या केसेसमध्ये एक न्यायाधीश म्हणून वकिलांचे युक्तिवाद मोबाइलद्वारे रेकॉर्ड करायचो, असेही न्या. नायडू यांनी म्हटले.

दरम्यान, याचिकाकर्तींचे वकील आबाद पौडा यांनी या तिन्ही आरोपींची पार्श्वभूमी गुन्हेगारीची नाही, असे न्यायालयाला सांगितले.‘आरोपी सुशिक्षित आहेत. गुन्हेगार नाहीत. एका महिलेने तिचे आयुष्य संपविले, हे दुर्दैवी आहे. पण आयुष्य पुढे जगायलाच हवे. आरोपी खटल्याला सामोरे जाण्यास तयार आहेत. गेले ५९ दिवस त्या कारागृहात आहेत. नायर रुग्णालयाने त्यांना निलंबित केले. त्यांना त्यांचे शिक्षण पुढे सुरू ठेवायचे आहे. त्यासाठी त्या मुंबईबाहेर जाण्याचा विचारात आहेत,’ असा युक्तिवाद पौडा यांनी केला.

‘सुसाइड नोटमध्ये मानसिक छळाबाबत नमूद करण्यात आले आहे. मात्र, या तीन पानी नोटमध्ये आरोपींनी जातिवाचक टिप्पणी केल्याचा कुठेही उल्लेख करण्यात आलेला नाही,’ असे पौडा यांनी न्यायालयाला सांगितले.

जामिनावरील सुनावणी ३० जुलैलातिन्ही डॉक्टरांवर पायल तडवीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. तसेच अँटी रॅगिंग अ‍ॅक्ट, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (हिंसाचार प्रतिबंध) कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आता या तिघींच्या जामीन अर्जावरील सुनावणी ३० जुलै रोजी ठेवण्यात आली आहे.

टॅग्स :आत्महत्या