Join us

मुंबई विद्यापीठाची युवा महोत्सवात विजयी पताका

By admin | Updated: November 24, 2014 01:23 IST

असोसिएशन आॅफ इंडियन युनिव्हर्सिटी आयोजित ३०व्या पश्चिम विभागीय युवा महोत्सवावर मुंबई विद्यापीठाने विजयी पताका फडकवली आहे.

मुंबई : असोसिएशन आॅफ इंडियन युनिव्हर्सिटी आयोजित ३०व्या पश्चिम विभागीय युवा महोत्सवावर मुंबई विद्यापीठाने विजयी पताका फडकवली आहे. महोत्सवामध्ये मुंबई विद्यापीठाने निर्विवाद वर्चस्व राखत लिटरेचर, फाइन आटर्स, थिएटर, म्युझिक आणि डान्स या पाच विभागांतील स्पर्धांमध्ये विजयी सलामी देत पुन्हा एकदा युवा महोत्सवाचा चषक मुंबई विद्यापीठाच्या टीमने आपल्याकडेच राखला आहे.महर्षी दयानंद सरस्वती विद्यापीठ, अजमेर येथे १९ ते २२ नोव्हेंबरदरम्यान हा महोत्सव पार पडला. यामध्ये महाराष्ट्र, गोवा, गुजरात आणि राजस्थान येथील ३६ विद्यापीठांनी भाग घेतला होता. ३६ विद्यापीठांमध्ये रंगलेल्या या महोत्सवामध्ये मुंबई विद्यापीठाने ५पैकी ४ चषकांवर आपली मोहर उमटवली आहे. मुंबई विद्यापीठाने ८७ गुणांची कमाई करीत युवा चषकावर आपले वर्चस्व कायम राखले आहे. एसएनडीटी विद्यापीठ (४०) आणि बनस्थाली विद्यापीठ (३७) या विद्यापीठांना मागे टाकत मुंबई विद्यापीठाने विजयी पताका फडकावली आहे.स्पर्धक आणि प्रेक्षकांच्या प्रचंड प्रतिसादात पार पडलेल्या या महोत्सवामध्ये निर्विवाद वर्चस्व राखत मुंबई विद्यापीठाने बाजी मारली आहे. २ ते ६ फेब्रुवारीदरम्यान इंदुर येथे आयोजित होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवामध्येही विद्यापीठ विजयी पताका फडकावेल, असा आशावाद विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)