मुंबई : भरधाव वेगात असलेली मोटारसायकल खड्डय़ात पडल्याने दोन अल्पवयीन तरुणांचा कांदिवलीत मृत्यू झाला. याबाबत पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून चौकशी सुरू केली आहे.
जुबेर खान (17) आणि रियाज सिद्धिकी (16) अशी या मृत तरुणांची नावे असून, दोघेही कांदिवलीच्या लालजीपाडा परिसरात राहत होते. जुबेर व रियाज बारावीत शिकत होते. शनिवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मथुरादास रोडवरून कांदिवली रेल्वे स्थानकाच्या दिशेने जात होते. याच मार्गावर पालिकेकडून खड्डे बुजवण्याचे काम सुरू आहे. दोघांची भरधाव मोटारसायकल या मार्गावरील एका खड्डय़ातून गेली आणि नियंत्रण सुटल्याने दोघेही पडले. यात दोघांचा मृत्यू झाला. दोघांच्या मृत्यूला मुंबई महापालिका जबाबदार असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला. कुटुंबीयांच्या आरोपानुसार पोलीस चौकशी करणार आहेत. मात्र या अपघातात खड्डय़ांचा संबंध नसून हा अपघात बॅरिकेडवर आदळल्याने झाल्याचे मुंबई महापालिकेने म्हटले आहे.