मराठी चित्रपट एकीकडे आकाशाला गवसणी घालण्यास निघाला असताना दुसरीकडे त्याला विरोधाभास ठरावा असेही काही घडताना दिसते. विशेषत: एखाद्या चित्रपटाकडून खूप अपेक्षा असतानाही तो अपेक्षापूर्तीच्या जवळपासही पोहोचू नये, याचे दु:ख सहजासहजी हलके होत नाही. सध्याच्या सामाजिक चित्रपटांच्या लाटेत करमणूक करणा:या चित्रपटांची गरज होतीच आणि त्या दृष्टिकोनातून ‘आंधळी कोशिंबीर’ या चित्रपटाकडे पाहिले असे होते. परंतु आघाडीच्या कलावंतांना घेऊनही ही कोशिंबीर म्हणावी तेवढी चटकदार झालेली नाही. या कोशिंबिरीच्या मूळ साहित्यातच भेसळ झाल्याने तिची कृती चवदार होता होता राहिली आहे.
निव्वळ मनोरंजनात्मक चित्रपट द्यायचा असला तरी त्याचा पाया मजबूत असावाच लागतो अन्यथा विनोदाच्या नावाखाली केलेला तो फक्त मसालेदार अट्टहास ठरतो. विनोद निर्मितीसाठीही जे गांभीर्य लागते, त्याची उणीव असली की निर्माण होणारा विनोद हसवणुकीच्या पातळीर्पयत पोहोचू शकत नाही. केवळ विनोदासाठी विनोद असा मामला असल्यास तो विनोद बळेबळेच हसवण्यास भाग पाडणारा विनोदी प्रकार ठरतो. या आंधळी कोशिंबीरचेही असेच काहीसे झाले आहे.
भांडण हाच उद्योग असलेले बापू सदावर्ते यांचा श्रीरंग हा ऐतखाऊ मुलगा! व्यवसाय करण्याच्या नादात त्याने डोक्यावर कर्ज करून ठेवले आहे आणि आता ते फेडण्यासाठी राहते घर गहाण टाकण्यार्पयत त्याची मजल जाते. त्यासाठी बापूंची सही अनिवार्य असल्याने काय करता येईल याचा खल तो आणि त्याचा मित्र वसंत करतात. यासाठी बापूंना भांडणात कुणीतरी सव्वाशेर भेटला पाहिजे, अशी कल्पना ते लढवतात आणि यात शांताबाईंची एन्ट्री होते. त्यातच गुंड, वकील, प्रेयसी, न्यायाधीश आदी व्यक्तिरेखा यात
वर्णी लावत हा गोतावळा वाढवत नेतात.
अचाट तर्क, बेत, कल्पना याचा मारा करीत हा चित्रपट विनोदाचा सडा पाडत असल्याचे केवळ भासवतो, कारण ओढूनताणून आणलेले प्रसंग विनोदाचा पोकळ आभास निर्माण करतात. दिग्दर्शक आदित्य इंगळे
यांना ही कोथिंबीर चटपटीत करता आली असती, परंतु तसे झालेले
नाही.
अभिनयाच्या प्रांतात अशोक सराफ (बापूू) आणि वंदना गुप्ते (शांताबाई) यांच्या व्यतिरिक्त सगळा आनंदच आहे. या तगडय़ा स्टारकास्टमध्ये आनंद इंगळे, हृषीकेश जोशी, अनिकेत विश्वासराव, हेमंत ढोमे, प्रिया बापट, मृण्मयी देशपांडे असे चमकते तारे असूनही केवळ धांगडधिंगाच्या पलीकडे त्यांचा प्रभाव पडलेला नाही. अशोक सराफ,
वंदना गुप्ते यांच्यासह श्रीकांत मोघे अशा ज्येष्ठ मंडळींनी या कोशिंबिरीत का सहभागी व्हावे, असाही एक प्रश्न उपस्थित झाल्यास नवल वाटू नये.
या कोशिंबिरीची पाककृती मुळातच विस्कळीत असल्याने एवढे जानेमाने चेहरेही तिची चव बदलू शकलेले नाहीत आणि तसा प्रयत्न केल्याचेही आढळत नाही. एकूणच गांभीर्य हरवलेला विनोदीपट, असेच या चित्रपटाविषयी म्हणता येईल.