Join us  

'घरघर नव्हे, तर फरफर मोदी'; विहिंप नेत्याची जळजळीत टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 5:59 PM

राम मंदिरावरुन मोदींवर शरसंधान

भार्इंदर : वादग्रस्त विधांनासाठी प्रसिद्ध असलेले विश्व हिंदू परिषदेचे वरिष्ठ नेते आचार्य धर्मेंद्र यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. भाजपच्या 'घरघर मोदी' या घोषणेवरुन आचार्य धर्मेंद्र यांनी मोदींवर निशाणा साधला. 'ते घरघर मोदी नव्हे, तर फरफर मोदी,' असल्याची टीका त्यांनी केली. मोदींनी त्यांच्या कार्यकाळात कोणतंही चांगलं काम केलं नसल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. भार्इंदर पूर्वेकडील जेसलपार्क येथे आयोजित परशुराम जयंतीला उपस्थित राहण्यासाठी आले असताना त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.'मोदींची सत्ता केंद्रात असतानाही त्यांना राममंदिर बांधता येत नाही. त्यांच्या सरकारनं कायदा केल्यास मंदिर बांधण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. मात्र असं असतानाही मोदी तसं करत नाहीत. मंदिर बांधण्यासाठी आम्ही सतत पाठपुरावा करत असतानाही ते दाद देत नाहीत,' असं आचार्य धर्मेंद्र म्हणाले. 'यापूर्वी केंद्रात अटलबिहारी वाजपेयींचे सरकार होतं. त्यावेळी घरघर अटल कोणी म्हटलं नव्हतं. यंदा मात्र मोदी आपला वैयक्तिक प्रचार करुन लोकांची फसवणूक करत आहेत,' असा आरोप त्यांनी केला. यावेळी आचार्य धर्मेंद्र यांनी प्रवीण तोगडियांवरदेखील भाष्य केलं.  प्रवीण तोगडीया हे स्वार्थी नेते होते. त्यामुळेच त्यांना बाजूला करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. गुजरातमधील निवडणुकीत मोदींसाठी काम केल्याचा दावा करत त्यांनी थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरींवर हल्लाबोल केला. गडकरींनी गाईच्या पोटात ३३ कोटीं देवी-देवता असल्यावर संशय व्यक्त केला असल्यानं त्यांना हिंदू धर्माची काय माहिती, असा प्रतिप्रश्न करुन सध्याचे नेते त्यांच्या स्वार्थासाठीच काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला. भारत सध्या गोमांस निर्यात करणारा देश झाला असून आजही सर्रासपणे गार्इंची हत्या केली जात असल्याचं त्यांनी सांगितले. लोकांनी देवतांना मानले पाहिजे, असं आवाहन करुन सध्याचे भोंदू महाराज स्वत:ला संत म्हणवून घेत लोकांची फसवणूक करत असल्याचा आरोप आचार्य धर्मेंद्र यांनी केला. आसाराम, रामरहिम यांचे नाव घेऊन त्यांनी हा आरोप केला. आचार्य धर्मेंद्र यांनी महात्मा गांधींच्या राष्ट्रपिता या उपाधीवर आक्षेप घेत त्यांना भगत सिंग यांच्या मृत्यूला जबाबदार ठरवलं. जवाहरलाल नेहरु यांच्यामुळे नेताजी सुभाषचंद्र बोस यांना भारत देश सोडावा लागल्याचा दावाही त्यांनी केला. वादग्रस्त विधानं केल्यानं आचार्य धर्मेंद्र यांना गतवर्षी राजस्थान न्यायालयानं १ वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. मात्र यानंतरही त्यांची वादग्रस्त विधानं सुरूच आहेत. 

टॅग्स :नरेंद्र मोदी