Join us  

राणेंनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला नसता तर आज महाराष्ट्राचे चित्र वेगळे असते– नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 8:42 PM

माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांच्या पुस्तकाचे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे प्रकाशन करण्यात आले.

मुंबईः माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांच्या पुस्तकाचे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे प्रकाशन करण्यात आले. ‘नो होल्ड्स बार्ड’ आणि ‘झंझावात’ या मराठी आवृत्तीचे प्रकाशनादरम्यान नितीन गडकरी आणि शरद पवार उपस्थित होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी नारायण राणेंवर स्तुतिसुमनं उधळली आहेत. नारायण राणेंनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी आमच्यात थोडीफार धुसफूस झाली. शिवसेना सोडू नका, असं मी राणेंना समजावलं होतं. त्यावेळी राणेंच्या डोळ्यातही अश्रू आले होते, तसेच मी हा निर्णय आनंदानं घेत नसल्याचं त्यांनी मला सांगितलं, याचीही आठवण नितीन गडकरींनी करून दिली. राणेंकडे चांगलं व्यवस्थापन कौशल्य होते. त्यावेळी नारायण राणेंनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला नसता तर आज महाराष्ट्राचे चित्र वेगळे असते’, असं नितीन गडकरी म्हणाले आहेत. बाळासाहेबांचा स्वभाव परखड होता. पण बाळासाहेबांचंसुद्धा राणेंवर अपार प्रेम होतं. काळानुरूप राजकारणात अनेक बदल होत गेले असून, बदलत्या परिस्थितीनुसार राजकारण्यांना बदलावं लागलं. नारायण राणे कधी परिस्थितीसमोर हतबल झालेले नाहीत. महाराष्ट्र आणि मराठी माणसावर राणेंनी भरपूर प्रेम केले. तसेच राणेंच्या या पुस्तकात त्यांचा फक्त 25 टक्के इतिहास दिलेला आहे. राणेंच्या भूतकाळातील 75 टक्के इतिहास हा पुस्तकात छापण्यात आलेला नाही. 2001 ते 2009 या काळातील त्यांच्या जीवनातील घडामोडी मी जवळून पाहिलेल्या आहेत’, याची आठवणही गडकरींनी करून दिली आहे.तसेच झंझावात हा शब्द राणेंच्या नेतृत्वाला शोभणारा आहे. पालिका शाळेतील विद्यार्थ्याने मेरिट मिळवल्याप्रमाणेच राणेंचं आयुष्य आहे. राणेंचा स्वभाव आणि माझा स्वभाव जवळपास सारखाच आहे. आमच्या दोघांच्याही स्वभावात एक साम्य आहे. आम्हाला छळ आणि कपट करणं जमत नाही. आम्ही दोघेसुद्धा स्ट्रेट फॉरवर्ड म्हणजे जे काही आहे तो तोंडावर बोलणारे आहोत. राणेंनी शिवसेना सोडली तरी माझी आणि राणेंची मैत्री कायम राहिली. नारायण राणे आणि गोपीनाथ मुंडे यांना आयुष्यात कधीही विसरू शकत नाही, असं यावेळी नितीन गडकरी म्हणाले.

टॅग्स :नारायण राणे