मुंबई : ज्येष्ठ पत्रकार व साप्ताहिक विवेक, मुंबई तरुण भारतचे माजी संपादक चित्तरंजन द. पंडित यांचे गुरुवारी पहाटे साडेपाच वाजता निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. चित्तरंजन पंडित यांचा जन्म धुळे येथे ४ आॅगस्ट १९२७ रोजी झाला. १९४० साली ते मुंबईत आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून त्यांनी काही काळ काम केले होते. त्याचबरोबर त्यांनी पाच वर्षे साप्ताहिक विवेकच्या संपादकपदाची धुरा वाहिली होती. १९६१ ते १९८१ या प्रदीर्घ काळात त्यांनी महाराष्ट्र टाइम्समध्ये विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या होत्या. १९८१ साली मुंबई सांज तरुण भारतच्या संपादकपदी त्यांची नियुक्ती झाली. त्यानंतर १९८४ पासून १९८७ पर्यंत त्यांनी तरुण भारतच्या मुंबई, पुणे व सोलापूर या आवृत्त्यांचे संपादक म्हणून काम पाहिले. स्वातंत्र्यसैनिक सी.व्ही. वारद यांचे चरित्र चित्तरंजन पंडित यांनी लिहिले होते. त्याचप्रमाणे सा. विवेकमधील ‘स्पष्ट बोलतो माफ करा’ व तरुण भारतमधील ‘मोरपीस’, ‘दशा आणि दिशा’ इ. त्यांचे सदरलेखन खूप गाजले होते. अखिल भारतीय मजदूर संघ, भारतीय कुष्ठनिवारक संघ, विहिंप इ. संस्थांसाठी त्यांनी काम केले होते. (प्रतिनिधी)
ज्येष्ठ पत्रकार चित्तरंजन पंडित कालवश
By admin | Updated: October 30, 2015 01:02 IST