मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री नयनतारा यांच्या पार्थिवावर आज दुपारी शिवाजी पार्कस्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. रविवारी मध्यरात्री त्यांचे निधन झाले. आज सकाळी वांद्रे येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्या वेळी त्यांच्या आप्तस्वकीयांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. मराठी चित्रपट व नाट्यसृष्टीतील एक काळ गाजवलेल्या या ज्येष्ठ अभिनेत्रीचे अंत्यदर्शन घेण्यासाठी मात्र या क्षेत्रांतील मान्यवरांची अनुपस्थिती होती. केवळ अभिनेते विजय गोखले यांनी त्यांच्या वांद्रे येथील निवासस्थानी; तर अभिनेते व अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष विजय पाटकर यांनी स्मशानभूमीत जाऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्यासह आमदार छगन भुजबळ, सांस्कृतिक कार्य संचालक संजय कृष्णाजी पाटील, नाट्यनिर्माते व नयनतारा यांचे आप्त शशिकांत शिर्सेकर असे मोजके मान्यवर अंत्यसंस्कारासाठी उपस्थित होते. (प्रतिनिधी)> ‘आता होती, गेली कुठं?’ हे माझे पहिले नाटक मी नयनतारा यांच्यासोबत केले होते. त्यांच्यात प्रचंड उत्साह होता. ‘स्मार्ट वधू पाहिजे’ या मी दिग्दर्शित केलेल्या नाटकात त्यांनी भूमिका केली होती. विनोदी अभिनय कसा करायचा, हे मी त्यांच्याकडून शिकलो. मला त्यांच्याबरोबर चित्रपट करायचा होता, पण ते काही शक्य झाले नाही. धमाल, हसरे असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते.- विजय पाटकर > १९८८मध्ये मी निर्माता म्हणून ‘नवरा-बायको’ हा चित्रपट केला होता. त्यात नयनतारा यांनी महत्त्वाची भूमिका केली होती. ‘शांतेचं कार्ट...’ असो किंवा ‘अशी ही बनवाबनवी’ असो, त्यांचा अभिनय वाखाणण्याजोगा होता. अनेक कलाकारांसोबत त्यांनी विविध प्रकारच्या भूमिका रंगवल्या. जुन्या काळात त्यांनी रंगभूमी व चित्रपटसृष्टी गाजवली होतीच, पण अलीकडेही त्यांनी केलेल्या भूमिका लक्षात राहणाऱ्या होत्या.- छगन भुजबळ
ज्येष्ठ अभिनेत्री नयनतारा पंचत्वात विलीन
By admin | Updated: December 2, 2014 00:47 IST