Join us  

नालासोपाऱ्यात नायजेरियन व्यक्तींकडून गाड्यांची तोडफोड

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2019 5:10 AM

५० ते ६० वाहनांचे नुकसान : नागरिकांनाही जबर मारहाण

नालासोपारा : पूर्वेकडील परिसरातील ९० फूट रोडवरील प्रगतीनगर परिसरात एका नायजेरियनला मारहाण करण्यात आली. त्यात त्याचा मृत्यू झाल्याने संतप्त नायजेरियन व्यक्तींनी मंगळवारी मध्यरात्री दगडफेक करून सुमारे ५० ते ६० वाहनांच्या काचा फोडून नुकसान केले आहे. तर काही नागरिकांनाही मारहाण केली आहे.

नालासोपारा पूर्वेकडील प्रगतीनगरमध्ये राहणाºया जोसेफ या नायजेरियन तरुणाला काही अनोळखी लोकांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्याला उपचारासाठी जवळच्या महानगरपालिकेच्या रुग्णालयात नेले. पण त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह पाहिल्यानंतर संतापलेल्या ६ ते ७ नायजेरियन लोकांनी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास नगीनदास पाडा, प्रगतीनगर, ९० फुटी रोड या परिसरातील रस्त्याच्या कडेला उभे करून ठेवलेले ट्रक, टेम्पो, रिक्षा, कार अशा ५० ते ६० वाहनांवर दगड मारून त्यांच्या काचा फोडल्या. दोघा तिघांना मारहाणही झाल्याचे सूत्रांकडून कळते. एकूणच या प्रकारामुळे या परिसरात रात्रभर भीतीचे वातावरण होते.

तुळींज पोलिसांनी याप्रकरणी अपघाती मृत्यू झाल्याची नोंद करत मृतदेह शवविच्छेदनसाठी पाठवला आहे. या घटनेची माहिती मिळताच तुळींज पोलीस, एसआरपी असा पोलिसांचा मोठा फौजफाटा रात्रभर उपस्थित होता.जोसेफचा मृतदेह शवविच्छेदनसाठी पाठविला आहे. परदेशी नागरिक असल्याने व्हिडीओग्राफीमध्ये शवविच्छेदन होत असून, तो अहवाल आल्यावर पुढील कारवाई करणार आहे. वाहनांची तोडफोड मध्यरात्री करण्यात आली आहे. -डी.एस.पाटील (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तुळींज पोलीस ठाणे)