Join us  

सीएनजी पंपांवर वाहनांच्या रांगा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2019 6:00 AM

मुंबईतील पुरवठ्यावर परिणाम; उरणच्या ओएनजीस गॅस प्लांटला लागलेल्या आगीचा फटका

मुंबई : रायगड जिल्ह्यातील उरण येथील ओएनजीसी गॅस प्लांटमध्ये लागलेल्या आगीचा परिणाम मुंबईतील सीएनजी पंपांवर दिसून आला. मानखुर्द ते वडाळा परिसरातील महत्त्वाच्या सीएनजी पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. चेंबूर नाका येथील भारत पेट्रोलियम, एचपी लालडोंगर येथील इंडियन आॅइल, आणिक आगार व ड्युक्स कंपनीजवळील महानगर गॅस या सर्व पंपांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. काही पंपांवर गॅसपुरवठा कमी प्रमाणात होत होता, तर काही पंपांवरील गॅसपुरवठा बंद होता.

गॅस भरण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असताना, काही वाहनचालकांनी दुहेरी व तिहेरी रांगा लावून ठेवल्या होत्या. आधीच मेट्रोचे सुरू असलेले काम व खड्डे, यामुळे सायन-पनवेल महामार्गावर वाहतूककोंडी होते. त्यातच चालकांनी रांगा लावून अर्धा रास्ता व्यापल्यामुळे येथे मोठी वाहतूककोंडी झाली होती. दुपारपासून तासन्तास रांगेत वाहने उभी केल्यामुळे काही वाहनांमधील गॅस संपला, यामुळे चालकांना रांगेत वाहनांना धक्का मारावा लगला. गॅस तुटवड्याचा सर्वात जास्त परिणाम रिक्षा-टॅक्सी व ओला-उबर चालकांना जाणवला. बराच वेळ गॅस भरण्यासाठी रांगेत राहावे लागल्यामुळे दिवसाच्या कमाईवर परिणाम झाला, असे त्यांनी सांगितले. पुरवठा सुरळीत होण्यास किती वेळ लागेल, हे माहिती नसल्याने चालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.‘पुरवठा सुरळीत सुरू ठेवण्याचा प्रयत्न’स्थानिक सीएनजी ग्राहकांना पुरवठा सुरळीत सुरू ठेवण्याचा एमजीएलचा प्रयत्न असेल, असे महानगर गॅस कंपनीने म्हटले आहे. उरणच्या दुर्घटनेनंतर पाइपलाइनमधून कमी दाबाने गॅसपुरवठा होत असल्याने, मुंबई आणि मुंबईलगतच्या परिसरामध्ये अनेक सीएनजी पंपावर सीएनजीची कमतरता जाणवू शकते, असे कंपनीने स्पष्ट केले आहे. औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांनी इंधनासाठी पर्यायी व्यवस्था करावी, अशी सूचनाही केली आहे. ओएनजीसीचे काम पूर्ववत सुरू झाल्यानंतर एमजीएल नेटवर्क असलेल्या ठिकाणांवर गॅसचा पुरवठा पूर्ववत सुरू करण्यात येणार असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले.

टॅग्स :ऑटो रिक्षामुंबई