Join us

चिपळूण विभागातील वाहनांना मिळणार स्वत:ची ओळख

By admin | Updated: January 5, 2015 19:01 IST

परिवहन कार्यालय मंजूर : पाच तालुक्यांना मिळणार आता एमएच-५२चा क्रमांक

चिपळूण : सध्या वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाहनांसाठी आवश्यक परवाना मिळविण्यासाठी रत्नागिरी येथेच उपप्रादेशिक परिवहन कार्यालय असल्याने चिपळूण येथे अशा धर्तीवर कार्यालय व्हावे, या मागणीला अखेर संबंधित विभागाकडून हिरवा कंदील मिळाला आहे. चिपळूण येथील विभागाला एमएच-५२ असा क्रमांक मिळाला आहे. गेली अनेक वर्षे नवी ओळख करण्यासाठी चिपळूण तसेच उत्तर रत्नागिरीतील चारही तालुक्यांचा लढा सुरू होता.रत्नागिरी येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय असून, केळशी ते मंडणगडपासून खेड, दापोली, गुहागर, चिपळूण येथील वाहन चालकांना परवाना मिळविण्यासाठी रत्नागिरी येथे जावे लागत होते. यासाठी आर्थिक भुर्दंड सोसावा लागत होता. संबंधित अधिकारी उपलब्ध न झाल्यास पुन्हा हेलपाटे मारावे लागत असत. चिपळूण हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व्हावे, अशी मागणी खेर्डी येथील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पवार यांनी गेल्या ४ वर्षांपासून लावून धरली होती. याबाबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार हुसेन दलवाई यांच्याकडेही पत्रव्यवहार करण्यात आला होता. आठवड्यातून एक दिवस संबंधित विभागाचे अधिकारी चिपळूण येथील शासकीय विश्रामगृह येथे येतात. एका दिवसात काम होईल, याची शाश्वती नसल्याने काही वेळा माघारी जाण्याच्या घटनाही घडल्या आहेत. सामान्यांना परवाना काढण्यासाठी हेलपाटे मारण्याची वेळ परवानाधारकांवर येत आहे. काहीवेळा मानसिक त्रासही सहन करावा लागत होता. आता उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मंजूर झाल्याने पाच तालुक्यातील नवीन परवानाधारकांना एक दिलासा मिळेल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला आहे. (वार्ताहर)कापसाळ येथे शासकीय जमीन असून, या ठिकाणी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी इमारत उभी राहणे शक्य होणार आहे. येथील कार्यालयात लर्निंग लायसन कोटा वाढवून मिळणेही आवश्यक आहे. गेल्या ४ वर्षांच्या पाठपुराव्यानंतर चिपळूण येथे हे कार्यालय मंजूर झाल्याने रत्नागिरी येथे मारावे लागणारे हेलपाटे थांबणार आहेत. - प्रकाश पवार,सामाजिक कार्यकर्ते, चिपळूणचिपळूण, खेड, मंडणगड, दापोली, गुहागर या तालुक्यांना दिलासा.कार्यालयासाठी कापसाळ येथे शासकीय जागा असल्याने येथे हे कार्यालय उभारणे शक्य. सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पवार यांच्या मागणीला परिवहन विभागाकडून हिरवा कंदील.पाच तालुक्यांचे हेलपाटे थांबणार.वाहनचालकांना परवान्यासाठी रत्नागिरी गाठण्याची आता गरज नाही.