नवी मुंबई : ठाणे-बेलापूर रोडवर तुर्भे नाका येथे मोठ्या प्रमाणात टोर्इंग व्हॅन व इतर वाहने उभी केली जातात. त्यामुळे महापालिकेच्या उद्यान विकसित करण्याच्या कामात अडथळा येत आहे. पालिका प्रशासनाने वाहतूक पोलीस व आरटीओला पत्र देऊनही या वाहनांवर अद्याप कारवाई झालेली नाही. नवी मुंबई महानगरपालिकेने शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी पामबीचसह प्रमुख रस्त्यांवर जास्तीतजास्त वृक्षलागवड करण्यास सुरवात केली आहे. शहरातील बहुतांश सर्व रोडच्या दुभाजकांमध्येही शोभेची झाडे लावली आहेत. या हिरवळीमुळे वायूप्रदूषण कमी होण्यास मदत होत आहे. ठाणे-बेलापूर रोडवर तुर्भे नाका येथे रेल्वे सुरक्षा भिंतीला लागून संरक्षण जाळी लावून सुशोभीकरण करण्याचे काम सुरू आहे. परंतु येथील रस्त्यावर अनधिकृतपणे जेसीबी, टोर्इंग व्हॅन व इतर वाहने उभी केली जात आहेत. १५ ते २० वाहने २४ तास उभी करण्यात येत आहेत. यामुळे सुशोभीकरणाचे काम करण्यात अडथळा येत आहे. महापालिकेने केलेल्या कामावर एक जेसीबीसारखे अवजड वाहन उभे करण्यात आले आहे. महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागाने तुर्भे वाहतूक पोलिसांना १५ डिसेंबरला पत्र दिले आहे. त्यात रोडवर उभ्या असणाऱ्या वाहनांमुळे काम करण्यात अडथळा निर्माण होत असून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. परंतु अद्याप या वाहनांवर कारवाई झालेली नाही. या ठिकाणी सुशोभीकरणाचे काम करणे अत्यंत आवश्यक आहे. सुशोभीकरण केले नाही तर या जागेवर पुन्हा अनधिकृत झोपड्या उभ्या राहण्याची शक्यता आहे.
महापालिकेच्या कामांमध्ये वाहनांचा अडथळा
By admin | Updated: December 26, 2014 00:01 IST