Join us

भाजीपाला थेट सिडको वसाहतीत

By admin | Updated: January 29, 2015 02:02 IST

जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा भाजपाला आणि शेतमालाची विक्री करण्याकरिता रायगड जिल्हा परिषदेने पनवेलवर बाजारपेठ म्हणून लक्ष केंद्रित केले आहे

कळंबोली : जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा भाजपाला आणि शेतमालाची विक्री करण्याकरिता रायगड जिल्हा परिषदेने पनवेलवर बाजारपेठ म्हणून लक्ष केंद्रित केले आहे. विशेषत: सिडको वसाहतीत थेट माल पोहचिवण्याच्या दृष्टीने संकल्प करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अरविंद म्हात्रे यांनी दिली. शेतकऱ्यांना शेतमाल पोहोचवण्यासाठी वाहन खरेदीवरही जिल्हा परिषदेकडून ५० टक्के अनुदान दिले जाणार आहे.एकेकाळी भाताचे कोठार म्हणून रायगड जिल्ह्याची ओळख होती. पनवेल आणि उरणमध्ये मोठ्या प्रमाणात लागवड केली जायची.मात्र ही सुपीक जमीन सिडकोने संपादित केली आणि नागरी वसाहती विकसित केल्या. त्यामुळे या भागातील शेती कमी झाली. नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाच्या पार्श्वभूमीवर पनवेल, कर्जत, खालापूर या भागात नयना प्रकल्प आला आहे. त्यामुळे याठिकाणी नियोजनबध्द विकास होणार आहे. खारघर, कामोठे, कळंबोली, नवीन पनवेल, द्रोणागिरी, उलवे, तळोजा, नावडे, करंजाडे यासारख्या सिडको वसाहती भविष्यात मोठ्या बाजारपेठा म्हणून उदयास येणार आहेत. ‘एपीएमसी’मधून घाऊक भाजीपाला वसाहतींमधील पदपथावर फेरिवाल्यांकडून चढ्या भावाने विक्री केले जात आहे. हा माल घाटमाथ्यावरून बाजार समितीत आणि तेथून सिडको वसाहतीत येतो. त्यामुळे वेळ आणि पैसा मोठ्या प्रमाणात खर्च होतो. ग्राहकांना पैसे देऊनही ताजी भाजी मिळत नाही. याच गोष्टीचा विचार करून रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कृषीमाल सिडको वसाहतीत थेट विक्रीकरता आणण्याचा मानस जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. यामुळे वसाहतीतील नागरिकांना जिल्ह्यातील ताजा भाजीपाला योग्य किमतींत मिळेल, असा विश्वासही पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. कृषी सभापती अरविंद म्हात्रे यांनी याकरीता पुढाकार घेतला आहे. नावडे येथे झालेल्या कृषी प्रदर्शन आणि मेळाव्याच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनापनवेल परिसरातील बाजारपेठीची माहिती देण्यात आली. उत्पादन क्षमता वाढविण्याकरीता मार्गदर्शन करण्यात आले. (वार्ताहर)