Join us
Daily Top 2Weekly Top 5

भाजीपाला जैसे थे, मिरची महागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:24 IST

मुंबई : गेल्या काही दिवसात भाज्यांची आवक वाढली असून त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून भाज्यांचे दर कमी आहेत. गेल्या ...

मुंबई : गेल्या काही दिवसात भाज्यांची आवक वाढली असून त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून भाज्यांचे दर कमी आहेत. गेल्या आठवड्याच्या तुलनेत हे दर जैसे थे आहेत. मात्र हिरवी मिरची महाग झाली आहे.

मुंबईत राज्यातील विविध जिल्ह्यांतून भाजीपाल्याचा पुरवठा करण्यात येतो. यामध्ये नाशिक, सातारा, पुणे, सांगली, कोल्हापूर येथून जास्त प्रमाणात भाजीपाला येतो. या भागातून येणाऱ्या भाजीपाल्याची आवक वाढली आहे.

मेथी १० , शेपू १०, लालमठ १० , चवळी १०, कोथिंबीर १० जुडी मिळत आहे. तर फरसबी ४०, वाल ४० ते ६० रुपये किलो मिळत आहेत. शेवगा ६०, पडवळ, टोमॅटो ६०, तोंडली ४०, मिरची १६० किलो दराने मिळत आहे. मिरची दर १०० किलो होते त्यामध्ये वाढ होऊन १६० किलो मिळत आहे. गेल्या आठवड्यात छटपूजेच्या पार्श्वभूमीवर फळांच्या दरात वाढ झाली होती. या आठवड्यातही हे दर जैसे थे आहेत. सफरचंद १०० ते १२० रुपये, डाळिंब ८० ते १५०, मोसंबी १००, संत्री ८० प्रतिकिलो मिळते, तर केळी ३० डझन, किवी ८ नग १०० रुपयांना मिळत आहे.

गेल्या काही दिवसात भाज्यांचे उत्पन्न वाढले आहे. भाज्या जास्त दिवस ठेवता येत नाहीत. खराब झाली तर फेकून द्यावी लागते त्यामुळे शेतकरी मिळेल त्या भावाने विकत आहेत. आम्हीही जास्त भाज्या आल्यामुळे स्वस्त दरात देत आहोत.

- सागर मोरे, भाजी विक्रेता

तेल महागणार

दिवाळीच्या आठवड्यात काही गर्दी होती. पण आता प्रतिसाद कमी आहे. बाजारात तेलाचा तुटवडा आहे, परंतु सध्या तेलाचे भाव स्थिर आहेत. मात्र तेलाचा तुटवडा कायम राहिल्यास येत्या काही दिवसांत तेल दोन ते पाच रुपयांनी महाग होईल.

- विवेक ठक्कर, व्यापारी

भाज्या स्वस्त झाल्या आहेत, मात्र हिरवी मिरची महाग झाली आहे. एक स्वस्त होते, पण काही ना काही महाग होत असते.

- संगीता माने, ग्राहक