नवी मुंबई : सीबीडी सेक्टर १, २, ३ आणि हायवेलगत कोकणभवनच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला अशी एकूण चार भाजी मार्केट आहेत, पण एकाही ठिकाणी परिपूर्ण सोयी-सुविधा नाहीत. ग्राहकांना मार्केटमध्ये जायची वाट शोधावी लागते तर विक्रेत्याला भाजी विक्रीची जागा शोधण्यापासून तयारी करावी लागते. एकंदरच ग्राहक व विक्रेत्यांची या मार्केटमध्ये कसरत चालू असते. काही वर्षांपूर्वी नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून भाजीविक्रेत्यांसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्यात आली होती. भाजी मार्केटमधल्या अपुऱ्या सोयींचा सामना करून दमलेल्या विक्रेत्यांनी अखेरीस रस्त्यावर बसण्याचा पर्याय स्वीकारला आहे. इथल्या नागरिकांचीही गैरसोय होत आहे. पादचाऱ्यांसाठी असलेले हे रस्ते आता भाजीविक्रेत्यांनी भरलेले दिसतात. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना आणि भाजीविक्रेत्यांना त्याची झळ सोसावी लागत आहे. इथले नागरिक आणि भाजीविक्रेता या दोघांशीही चर्चा केल्यावर त्यांनी आपापल्या बाजू मांडल्या. आम्हाला आमचा पदपथ मोकळा करून द्या, ही मागणी इथल्या रहिवाशांनी केली आहे, तर सर्व सोयी-सुविधांनी सुसज्ज असलेली आमच्या हक्काची एक स्वतंत्र जागा उपलब्ध करून द्या... या शब्दात इथल्या भाजीविक्रेत्यांनी मागणी केली. एक व्यावसायिक शहर म्हणून नावारूपास आलेल्या नवी मुंबईतील सीबीडीसारख्या परिसराला कामानिमित्त दिवसभरात अनेक लोक भेट देतात. कोकण भवनजवळ रस्त्याच्या कडेला बसलेल्या भाजीवाल्यांमुळे पादचाऱ्यांची गैरसोय होत आहे, एवढे मात्र खरे.
भाजी मार्केटच्या समस्या
By admin | Updated: February 24, 2015 22:06 IST