वसई : वसई, विरार, नालासोपारा या तीनही स्थानकांच्या आवारात फेरीवाल्यांच्या उच्छादामुळे प्रवाशांना जीव मुठीत धरून ये-जा करावी लागते. यासंदर्भात प्रवाशांच्या अनेक तक्रारी आल्यानंतर बुधवारी फेरीवाल्यांवर पोलीस व मनपा यंत्रणेने कारवाई केली. मात्र, अवघ्या १० मिनिटातच हे फेरीवाले आपल्या मूळ जागी पुन्हा स्थानापन्न झाले. वसई-विरार उपप्रदेशात रेल्वे, महानगरपालिका व ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीसमोर अनधिकृत फेरीवाल्यांचा प्रश्न उभा ठाकला आहे. महानगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर अनधिकृत फेरीवाल्यांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली. रेल्वेस्थानक लगतच्या सर्व पदपथांवर आज अनधिकृत फेरीवाल्यांचे साम्राज्य आहे. रेल्वेच्या आवारातही त्यांनी आपली दुकाने थाटल्यामुळे प्रवाशांना साधे ये-जा करणे जिकिरीचे झाले आहे. वसई रोड रेल्वेस्थानकाच्या पश्चिमकडील पोलीस चौकीलाच अनधिकृत फेरीवाल्यांचा घेराव आहे. तर बाहेर भर रस्त्यात हे फेरीवाले आपले स्टॉल लावून विक्री करत असतात. यासंदर्भात तक्रारी आल्यानंतर खा. चिंतामण वनगा यांनी भेट देऊन परिसराची पाहणी केली. त्यानंतर काही काळ फेरीवाले गायब झाले होते. मात्र, आता ते फेरीवाले पुन्हा आपल्या मुळ जागी स्थिरावले आहेत. त्यावर फेरीवाल्यांनी पोलीस व मनपा प्रशासनाने नागरीकांच्या डोळयात धूळफेक केली आहे.
वसईत फेरीवाल्यांचे पुन्हा मूळ जागीच बस्तान
By admin | Updated: December 18, 2014 23:52 IST