Join us

वसईत सुक्या मच्छीचा भाव वधारला

By admin | Updated: July 7, 2015 00:07 IST

खोल समुद्रातील मासेमारीबंदी तसेच मोठ्या माशांचे चढे भाव अशा दोन कारणांमुळे खवय्यांची भिस्त आता सुक्या मच्छीवर आहे. आठवडाबाजारात सुकी मच्छी मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आली आहे

वसई : खोल समुद्रातील मासेमारीबंदी तसेच मोठ्या माशांचे चढे भाव अशा दोन कारणांमुळे खवय्यांची भिस्त आता सुक्या मच्छीवर आहे. आठवडाबाजारात सुकी मच्छी मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आली आहे. दर पावसाळ्यात खवय्यांना या सुक्या मच्छीचाच आधार असतो. मासेमारीबंदीमुळे माशांचे बाजार आता ओस पडले असून आठवडाबाजार मात्र सुक्या मच्छीने बहरला आहे. पावसाळ्यातील मासेमारीबंदीचा काळ सुरू झाला असून मच्छीमारांनी आपापल्या बोटी समुद्रकिनारी शाकारून ठेवल्या आहेत. पापलेट, हलवा, कोलंबी, सुरमई, मांदेली व मुशी हे मासे खोल समुद्रात मिळतात. मात्र, हे मासे बंदीच्या काळात बाजारात पाहावयास मिळत नाहीत. या काळात खाडीतील मच्छी तसेच सुकी मच्छी यावर नागरिकांचा भर असतो. खाडीतील निवटे, खेकडे, तिसऱ्या तर सुक्या मच्छीमध्ये सोडे, खारे, सुके बोंबील, करंदी यांचा समावेश असतो. सध्या बाजारात निवट्यांना भरपूर मागणी आहे. सुकी मच्छीही निरनिराळ्या गावांमध्ये भरणाऱ्या आठवडाबाजारांत हमखास उपलब्ध असते.खाडीतील मासे मात्र त्या भागातील मच्छीबाजारात विकले जातात. मासेमारीबंदीचा काळ संपला की, मोठ्या माशांची आवक सुरू होते. पावसाळ्यामध्ये सुक्या मच्छीचा खरेदीविक्री व्यवहार कोट्यवधी रु.च्या घरात जात असल्याने पावसाळा सुरू होण्यापूर्वीच सुक्या मच्छीचा साठा करण्यात येत असतो. (प्रतिनिधी)