एनआयएकडून उच्च न्यायालयात मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : नानावटी रुग्णालयाने सादर केलेल्या अहवालानुसार वरवरा राव यांची प्रकृती उत्तम आहे. त्यामुळे त्यांची जामिनावर सुटका न करता त्यांची रवानगी तळोजा कारागृहात करा, अशी मागणी एनआयएने उच्च न्यायालयात केली.
राज्य सरकारने सांगितल्याप्रमाणे राव यांना रुग्णालयात ठेवण्याची आवश्यकता भासल्यास त्यांना जे. जे. रुग्णालयात ठेवण्यात येईल. सर्व काळजी घेतली असल्याने राव यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात यावा आणि त्यांची रवानगी कारागृहात करावी, अशी मागणी एनआयएच्या वतीने अतिरिक्त सॉलिसीटर जनरल अनिल सिंग यांनी उच्च न्यायालयात केली.
वरवरा राव यांनी प्रकृतीच्या कारणास्तव आपल्याला जामीन मिळावा, यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. तसेच त्यांच्या पत्नीनेही उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्या. एस. एस. शिंदे व न्या. मनिष पितळे यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर सुनावणी होती. राव यांना रुग्णालयात ठेवण्याची आवश्यकता नाही, असे नानावटी रुग्णालयाने अहवालात म्हटले आहे, अशी माहिती सिंग यांनी दिली. न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी गुरुवारी ठेवली आहे.
.....................