Join us  

वर्सोव्याच्या आमदार डॉ. भारती लव्हेकर ठरल्या फर्स्ट लेडी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2018 11:15 PM

वर्सोवा विधानसभा मतदारसंघातील भाजपाच्या विद्यमान आमदार डॉ. भारती लव्हेकर यांना येत्या 20 जानेवारी रोजी केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाच्या वतीने फर्स्ट लेडी हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे.

मुंबई- वर्सोवा विधानसभा मतदारसंघातील भाजपाच्या विद्यमान आमदार डॉ. भारती लव्हेकर यांना येत्या 20 जानेवारी रोजी केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाच्या वतीने फर्स्ट लेडी हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. येत्या 20 जानेवारी रोजी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या महिलांना फर्स्ट लेडी या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. देशातील गरजू महिलांसाठी पहिली सॅनिटरी नॅपकिन पॅड बँक सुरू करून समाजात एक नवा आदर्श निर्माण केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

मुंबईतील आंबोली आणि ओशिवरा पोलिस ठाण्यामध्ये सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशिन्स उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुंबईतील पोलिस ठाण्यात सदर मशीन बसवण्याचा हा पहिला उपक्रम आहे. तळागाळातील महिलांचे ते 5 दिवस सुसह्य करण्याच्या दृष्टिकोनातून झटणा-या वर्सोवा विधानसभा मतदारसंघातील भाजपा आमदार डॉ. भारती लव्हेकर यांनी हा उपक्रम वर्सोवा विधानसभा मतदारसंघात सुरू केला असून येथील शाळा, महाविद्यालय, सरकारी कार्यालय आणि अन्य ठिकाणी त्यांनी याआधी सदर मशीन उपलब्ध करून दिली आहेत.सर्वसामान्य महिला ह्या सेवेचा लाभ घेत असताना त्याची व्याप्ती महिला पोलिसांकरिता उपलब्ध करून देण्याची गरज मला जाणवली त्यामुळे मी आंबोली आणि ओशिवरा ह्या दोन्ही पोलीस स्टेशन्स मध्ये सुरू करण्याचा संकल्प केला. आज त्यास मूर्त स्वरूप आल्याचे समाधान मिळाले, अशी प्रतिक्रिया डॉ. लव्हेकर यांनी व्यक्त केली. महिलांच्या त्या 5 दिवसांच्या वेदना अधिक सुसह्य करून त्यांना सॅनिटरी पॅड्सची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी डॉ. लव्हेकर यांची सामाजिक संस्था ' ती फाऊंडेशन'  2009 पासून कार्यरत आहे. त्यांच्या डॉटर्स ऑफ वर्सोवा' या मोहिमेअंतर्गत सॅनिटरी पॅड्सचे मोफत वाटप, मोफत सॅनिटरी पॅड एटीएम आणि डिस्पोझल मशिन्स, मॅनस्ट्रुअल हेल्थ किट सॅनिटरी पॅड बँकची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

यावेळी आंबोली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारत गायकवाड, ओशिवरा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष खानविलकर आणि पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी वार्ड क्रमांक 60चे नगरसेवक व प्रभाग समिती अध्यक्ष योगीराज दाभाडकर आणि वॉर्ड क्रमांक 63च्या नगरसेविका रंजना पाटील उपस्थित होते.