पीएमसी बँक घोटाळा प्रकरण : आज हजर राहण्याची शक्यता
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत या सोमवारी सक्तवसुली संचालनालयाकडील (ईडी) चौकशीसाठी गैरहजर राहिल्या. पीएमसी बँक घोटाळाप्रकरणी त्यांना दुसऱ्यांदा नोटीस बजावण्यात आली होती. दरम्यान, त्या आज, मंगळवारी ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
वर्षा राऊत यांची ४ जानेवारीला ईडीच्या अधिकाऱ्यांनी साडेतीन तास चौकशी केली. त्यानंतर त्यांना पुन्हा चौकशीला हजर रहाण्याची नोटीस बजाविण्यात आली. पीएमसी बँक घोटाळ्यात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल असलेल्या प्रवीण राऊत यांच्या खात्यातून बारा वर्षांपूर्वी ५० लाख रुपये वर्षा राऊत यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले होते. त्याचप्रमाणे त्यांच्या विविध चार कंपन्यांमध्ये वर्षा राऊत यांची भागीदारी असल्याची माहिती पुढे आली होती. यासंदर्भात त्यांनी ४ जानेवारीला ईडीकडे जबाब दिला. मात्र, अद्यापही काही प्रश्नांबाबत स्पष्टता न झाल्याने ईडीने वर्षा राऊत यांना गेल्या आठवड्यात नव्याने समन्स बजावले हाेते.
....................................