Join us  

मुंबईत महाराष्ट्रदिनी विविध कार्यक्रम; ध्वजारोहण, गौरवगीत गायनासह संचलनाने डोळ्यांचे पारणे फेडले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2024 10:37 AM

हुतात्म्यांनाही आदरांजली.

मुंबई : महाराष्ट्र राज्याच्या ६५ व्या स्थापना दिनानिमित्त मुंबईत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ध्वजारोहण, पथकांचे लक्षवेधी संचलन, गौरवगीत गायन, सन्मान सोहळा, सनई-चौघडा अशा मंगलमय वातावरणात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा झाला. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर आयोजित मुख्य शासकीय समारंभात राज्यपालांनी ध्वज फडकविला.

महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी प्राणांचे बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना त्यांनी  आदरांजली अर्पण केली. याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, स्थानिक लोकप्रतिनिधी, मुख्य सचिव नितिन करीर, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, वरिष्ठ पोलिस अधिकारी, विविध देशांचे उच्चायुक्त, महावाणिज्य दूतावासातील प्रतिनिधी आणि नागरिक उपस्थित होते. या समारंभात किरण सुरेश शिंदे, अरुण सुरेश शिंदे, विवेक विनोद शिंदे यांनी सनई चौघडा वादन केले. शिबानी जोशी, पल्लवी मुजुमदार यांनी निवेदन केले.

याप्रसंगी झालेल्या संचलनात राज्य राखीव पोलिस बल, बृहन्मुंबई पोलिस सशस्त्र बल, बृहन्मुंबई दंगल नियंत्रण पथक, बृहन्मुंबई सशस्त्र महिला पोलिस दल, मुंबई लोहमार्ग पोलिस दल, महाराष्ट्र पोलिस ध्वज, मुंबई पोलिस ध्वज, राज्य राखीव पोलिस बल ध्वज, महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय ध्वज, मुंबई अग्निशमन दल ध्वज, वाहतूक पोलिस दल, मुंबई अग्निशमन दल, महापालिका सुरक्षा दल, बृहन्मुंबई व ठाणे जिल्हा सुरक्षारक्षक मंडळ, बृहन्मुंबई पोलिस आणि मुंबई लोहमार्ग पोलिस ब्रास बॅण्ड पथक, राज्य राखीव पोलिस बलाचे पाइप बॅण्ड पथक, बृहन्मुंबई पोलिस विभागाचे निर्भया वाहन पथक, मुंबई अग्निशमन दलाचे हाय राइज फायर फायटिंग वाहन, हायड्रोलिक प्लॅटफॉर्म आणि ६४ मीटर टर्न टेबल लॅडर आदी पथकांनी सहभाग घेतला. हा सोहळा अनेकांच्या  डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला.

विद्युत रोषणाईने उजळले विधानभवन -

विधानभवन येथे महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांच्या हस्ते व विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी ध्वजारोहण सोहळा झाला.

विधानभवनाची वास्तू नेत्रदीपक विद्युत रोषणाईने उजळून निघाली. विधानमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे, सहसचिव मेघना तळेकर, शिवदर्शन साठ्ये, उपसचिव राजेश तारवी, उमेश शिंदे, उपसचिव सायली कांबळी, अवर सचिव विजय कोमटवार, संचालक, वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्र, जनसंपर्क अधिकारी, नीलेश मदाने आदी उपस्थित होते. मुख्य सुरक्षा अधिकारी प्रदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मानवंदना दिली.

टॅग्स :मुंबईमहाराष्ट्र दिनरमेश बैस