Join us

वरावरा राव आणखी एक आठवडा ‘नानावटी’तच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:14 IST

एल्गार परिषद : उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देशलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : तेलुगू कवी आणि ज्येष्ठ विचारवंत वरावरा ...

एल्गार परिषद : उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : तेलुगू कवी आणि ज्येष्ठ विचारवंत वरावरा राव यांना आणखी एक आठवडा म्हणजेच १३ जानेवारीपर्यंत नानावटी रुग्णालयातच ठेवावे, असे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला गुरुवारी दिले.

वरावरा राव (वय ८०) हे एल्गार परिषद- शहरी नक्षलवाद प्रकरणात आरोपी आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राव यांना नोव्हेंबर महिन्यात नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. न्या. एस. एस. शिंदे व न्या. एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठाने राव यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी तहकूब करत त्यांना १३ जानेवारीपर्यंत रुग्णालयात ठेवण्याचे निर्देश सरकारला दिले.

गुरुवारच्या सुनावणीत राज्य सरकारने राव यांचा नवीन वैद्यकीय अहवाल न्यायालयात सादर केला. राव यांची तब्येत चांगली असून ते चालू शकतात, असे राज्य सरकारने न्यायालयाला सांगितले.

२१ डिसेंबर रोजी राज्य सरकार व एनआयएने राव यांना नानावटी रुग्णालयातून सरकारच्या जे. जे. रुग्णालयात किंवा तळोजा कारागृहात हलविण्याची विनंती केली होती. मात्र, न्यायालयाने त्यास नकार दिला. त्यांचे नवीन वैद्यकीय अहवाल पाहिल्याशिवाय आपण निर्णय घेणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते.

राव यांच्या जामीन अर्जाशिवाय राव यांच्या पत्नी हेमलता यांनी दाखल केलेल्या याचिकेवरही सुनावणी उच्च न्यायालयात घेत आहे. राव यांना कारागृहात पुरेशा वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाहीत. त्यामुळे त्यांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होत आहे, असे हेमलता यांनी याचिकेत म्हटले आहे. या याचिकांवर १३ जानेवारी रोजी सुनावणी ठेवण्यात आली आहे.