Join us
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात मार्च महिन्यात पूर्ण होणार आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:06 IST

उद्यापासून सुरुवातस्नेहा मोरेलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात उद्या, शनिवारी लसीकरणाला सुरुवात होणार असून, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचे ...

उद्यापासून सुरुवात

स्नेहा मोरे

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात उद्या, शनिवारी लसीकरणाला सुरुवात होणार असून, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचे दोन टप्पे मार्च महिन्यापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. राज्याला सध्या नऊ लाख ६३ हजार लसीचे डोस उपलब्ध झाले असून, आगामी काळात दोन टप्प्यांत आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करण्यात येईल.

सामान्य नागरिकांना लसीकरणाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेईपर्यंत सहा महिन्यांचा अवधी लागणार आहे. आरोग्य व फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांनंतर ज्येष्ठ नागरिक व अतिजोखमीचे आजार असणाऱ्यांना लस देण्यात येईल. राज्यात लसीकरण सुरू झाल्यानंतर पहिल्या दोन आठवड्यांत आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात येईल. दर दिवसाला किमान ४० ते ५० हजार व्यक्तींना लसीचा डोस देण्यात येईल.

कोविन पोर्टलवर आरोग्य कर्मचाऱ्यांची माहिती भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. सद्य:स्थितीत लस टोचण्यासाठी १७ हजार ७४९ व्हॅक्सिनेटर्स तसेच सात लाख ८४ हजारपेक्षा अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात ५० वर्षे व त्यापुढील वयोगट तसेच अतिजोखमीचे आजार असणाऱ्यांना लस देण्यात येईल; मात्र यासाठी केंद्र शासनाकडून निर्देश देण्यात येतील.

* सामान्यांना पाहावी लागणार सहा महिने वाट

राज्याच्या टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले की, राज्यातील सामान्य जनतेला लसीसाठी सहा महिने वाट पाहावी लागेल. या गटासाठी लस उपलब्ध करताना त्याच्या क्लिनिकल ट्रायल, किंमत, उपलब्धता, पुरवठा - वितरण हे सर्व घटक विचारांत घ्यावे लागतील. सध्या लसीचा वापर हा आपत्कालीन परिस्थितीत घेतलेला निर्णय आहे.

* पाच टप्प्यांत लसीकरण

खासगी व सरकारी आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात लस.

दुसऱ्या टप्प्यात शिक्षक, पोलीस, सरकारी नोकरदारांचे लसीकरण.

५० वर्षांवरील सर्वच व्यक्‍तींना तिसऱ्या टप्प्यात दिली जाणार लस.

५० वर्षांखालील को-मॉर्बिड रुग्ण (ज्यांना मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदयरोग आणि किडनी विकार यासारखे आजार आहेत), गरोदर मातांना चौथ्या टप्प्यात लस.

शाळा, महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना लस टोचण्याचे पाचव्या टप्प्यात नियोजन.

.............................