Join us  

कूपर हॉस्पिटलमध्ये लसीकरण मोहिमेला दिमाखात सुरवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 1:41 PM

लसीकरणाच्याआधी या केंद्राच्या बाहेर नोंदणी करून त्यांना टोकन देण्यात येत होते.

- मनोहर कुंभेजकर 

मुंबई: विलेपार्ले येथील पश्चिम येथील डॉ. आर.एन.कूपर हॉस्पिटलमध्ये लसीकरण मोहिमेला आज सकाळी 11.15  दिमाखात सुरवात झाली. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालयात अद्यावत लसीकरण केंद्र आजपासून सुरू झाले.आज दुपारी दीड वाजेपर्यंत सुमारे 150 जणांना लस देण्यात आली अशी माहिती येथील नोंदणी कक्षेतून देण्यात आली.

लसीकरणाच्या आधी या केंद्राच्या बाहेर नोंदणी करून त्यांना टोकन देण्यात येत होते. लसीकरण केंद्राच्या आत खास 1 ते 4 आणि 5 ते 8 असे लसीकरण कक्ष तयार करण्यात आले होते. लस टोचल्यानंतर त्यांना निरीक्षण केंद्रात सुमारे अर्धा तास ठेवण्यात येत होते.आणि जर लस घेतल्यानंतर काही त्रास झाला तर खास निरीक्षणालय कक्षाची सुविधा देखिल येथे उपलब्ध करण्यात आली. मात्र आज या केंद्रात लस घेतल्या नंतर कोणालाही त्रास झाला नाही.आणि पहिल्याच दिवशी येथील लसीकरण मोहिम यशस्वी झाली असे येथील अधिष्ठाता डॉ.पिनाकीन गुजर यांनी लोकमतला सांगितले.सायंकाळी 5 वाजेपर्यंत ही लसीकरण मोहिम सुरू असेल त्यांनी सांगितले.

एका व्यक्तीला इंजेक्शनची सुई टोचल्याप्रमाणे काही सेकंदात हातावर येथे लस दिली जात होतो,मात्र  एका व्यक्तीला साधारण 5 मिनिटांचा कालावधी लागत असल्याचे येथील चित्र होते. माजी आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत  आणि त्यांची पत्नी डॉ.अनिला सावंत यांना प्रथम लसीकरणाचा मान मिळाला.तापूर्वी येथील लसीकरण केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कोविड लसीचे उदघाटनपर भाषण स्क्रीन वर  उपस्थित मान्यवरांनी लाभ घेतला.

आज कूपर हॉस्पिटलमध्ये गेली 10 महिने कोरोनाशी लढा देणाऱ्या  500 डॉक्टर,नर्स,कर्मचारी,सफाई कामगार अश्या प्रकरच्या कूपर हॉस्पिटलसह इतर ठिकाणच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. एका वेळी चार जणांना लस घेता येईल असे खास दोन कक्ष तयार करण्यात आले होते. लस घेतल्यानंतर त्यांना देखरेख कक्षात काही वेळ ठेवण्यात आले.लस घेतल्याचा आनंद त्यांना झाला होता. तर कोणालाही लस घेतल्यानंतर काही त्रास झाला नाही.

या लसीकरण मोहिमेत मी पहिल्या दिवसापासून सहभागी असून लसीकरणाचा मान येथे प्रथम मी व माझ्या पत्नीला मिळाला. लस घेतांना कोणी भीती बाळगण्याचे कारण नाही.18 वर्षाच्या आतील तरुणांना लस दिली जाणार नसली तरी त्यांनी सतत मास्क लावणे,सतत हात धुणे,सोशल डिस्टनसिंग या त्रिसूत्रीचे पालन करणे गरजेचे आहे. आज प्रथम क्रमांकाचे 1 नंबरचे टोकन दिल्याबद्दल माझ्या व माझ्या पत्नीच्या आयुष्यातील हा मोठा ऐतिहासिक क्षण आहे. मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपनगर पालक मंत्री आदित्य ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आभारी आहे.- डॉ.दीपक सावंत माजी आरोग्य मंत्री

आज देशात कोविड 19 लसीकरण मोहिम सुरू झाली असून आम्ही यात सहभागी झालो याबद्धल अभिमान आहे. - डॉ.पिनाकीन गुजर,अधिष्ठाता कूपर हॉस्पिटल

लस घेतांना खूप अभिमान वाटला की,आज पहिल्या पाचात माझा क्रमांक लागला.गेली 10 महिने येथील तज्ञ म्हणून मी सतत कार्यरत होते.कोरोनाग्रस्त काही रुग्ण उपचारा दरम्यान जग सोडून गेले याबद्दल खूप दुःख झाले.मात्र आज कोरोनावर प्रभावी ठरणारी भारतीय लस खऱ्या अर्थाने सुरू झाली यामुळे खूप आनंद झाला आहे. कोरोनाच्या गेल्या 10 महिन्याच्या लढाईत कुटुंबाचे मोठे सहकार्य मिळाले. - डॉ.नयना दळवी, भूल तज्ञ कूपर हॉस्पिटल

10 ते 15 दिवसात येथे सुसज्ज लसीकरण केंद्र सुरू करण्यात सर्वांचा मोठा सहभाग मिळाला.मुंबईतील आद्यवत केंद्र करण्यासाठी आम्ही काम करणार आहे. आज पहिल्या पाच जणांमध्ये मला लस घेण्याचे  भाग्य मिळाले याबद्धल खूप आनंद झाला आहे.डॉ.प्रसाद पंडीत, फार्माकालॉजी विभागप्रमुख

टॅग्स :कोरोनाची लसमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस