Join us
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात एकाच दिवशी ४ लाख ६२ हजार नागरिकांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात शनिवारी एकाच दिवशी ४ लाख ६२ हजार ७३५ नागरिकांचे लसीकरण ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात शनिवारी एकाच दिवशी ४ लाख ६२ हजार ७३५ नागरिकांचे लसीकरण करून महाराष्ट्राच्या नावावर राष्ट्रीय विक्रमाची नोंद झाली. याची दखल घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यंत्रणेचे कौतुक करत अभिनंदन केले आहे. गुजरात, राजस्थान, उत्तरप्रदेश या राज्यांना मागे टाकत महाराष्ट्राने आतापर्यंत सुमारे ७३ लाख ४७ हजार ४२९ जणांचे लसीकरण करून देशात अग्रभागी राहण्यात सातत्य राखले आहे.

दिनांक १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाल्याच्या पहिल्याच दिवशी ३ लाखांहून अधिक जणांना लस देऊन राज्याने उच्चांक गाठला होता. ३ एप्रिल रोजी राज्यभर ४,१०२ लसीकरण केंद्रांच्या माध्यमातून आतापर्यंतची सर्वोच्च संख्या पार करत ४ लाख ६२ हजार जणांना लस देण्यात आली. शनिवारी पुणे जिल्ह्याने राज्यात सर्वाधिक ७६ हजार ५९४ जणांना लसीकरण करून राज्यात अग्रस्थान कायम राखले आहे. त्यापाठोपाठ मुंबई उपनगर ४६ हजार ९३७, नागपूर ४१ हजार ५५६, ठाणे ३३ हजार ४९० या जिल्ह्यांनी लसीकरणात आघाडी घेतली आहे.

मुंबईत शनिवारी ६४ हजार १८६ जणांना लस देण्यात आली. त्यातील ६० हजार ७५९ जणांना पहिला तर ३ हजार ४२७ जणांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण १३ लाख ३० हजार ५७३ नागरिकांना लस देण्यात आली. त्यात ११ लाख ७० हजार ६९० जणांंना पहिला तर १ लाख ५९ हजार ८८३ जणांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण २ लाख ५२ हजार ८८५ आरोग्य कर्मचारी, २ लाख ६४ हजार ६५ फ्रंटलाईन वर्कर, ५ लाख ८९ हजार ७७ ज्येष्ठ नागरिक तर ४५ ते ५९ वर्षांमधील गंभीर आजार असलेल्या २ लाख २४ हजार ५६६ नागरिकांना लस देण्यात आली.

लवकरच सहा लाखांहून अधिक नागरिकांना लस

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात राज्य पहिल्यापासूनच अग्रेसर राहिले आहे. कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्यात लसीकरणाला वेग देण्यासाठी सध्या होत असलेल्या लसीकरणाच्या दुप्पट संख्येने लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, यंत्रणेच्या प्रभावी कामगिरीमुळे आणि नागरिकांकडून मिळत असलेल्या प्रतिसादामुळे काल महाराष्ट्राने राष्ट्रीय विक्रमाची कामगिरी बजावली आहे. अशाच पद्धतीने लसीकरणाला वेग दिल्यास लवकरच राज्यात दिवसाला सहा लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट गाठता येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नमूद केले.