लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात सोमवारी ४७७ केंद्रांवर ३५,८१६ (७४ टक्के) आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण करण्यात आले. राज्यात दिवसभरात धुळे जिल्ह्यात सर्वात जास्त १४४ टक्के लसीकरण झाले आहे. पाठोपाठ वर्धा, भंडारा, उस्मानाबाद, सातारा या जिल्ह्यांत १०० टक्क्यांपेक्षा अधिक लसीकरण झाले.
राज्यात आतापर्यंत एकूण १ लाख ३५ हजार ७०१ जणांना लसीकरण करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली. राज्यात २६५ जणांना कोव्हॅक्सिन लस देण्यात आली आहे. दरम्यान, ३१ जानेवारीला पोलिओ लसीकरण असल्याने ३० जानेवारीचे कोरोना लसीकरण सत्र होणार नाही, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
२६५ व्यक्तींना कोव्हॅक्सिन लस
राज्यात सहा ठिकाणी कोव्हॅक्सिन लस देण्यात येत आहे. त्यातील अमरावती जिल्ह्यात ८० जणांना, पुणे येथे ३५, मुंबई ३४, नागपूर ६८, कोल्हापूर २६ आणि औरंगाबाद २२ अशी २६५ जणांना ही लस देण्यात आली.