Join us

राज्यात एकाच दिवशी पाच लाखांहून अधिक जणांना लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:06 IST

मुंबई : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात राज्याने आतापर्यंतची विक्रमी नोंद आज केली असून, सायंकाळी सहापर्यंत पाच लाखांहून अधिक नागरिकांना लस ...

मुंबई : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात राज्याने आतापर्यंतची विक्रमी नोंद आज केली असून, सायंकाळी सहापर्यंत पाच लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे. मंगळवारी लसीकरणाच्या आकडेवारीत वाढ होऊ शकते. ३ एप्रिल रोजी ४ लाख ६२ हजार ७३५ नागरिकांचे लसीकरण करून महाराष्ट्राने राष्ट्रीय विक्रम नोंदविला होता.

लसीकरणात महाराष्ट्र देशात सातत्याने अग्रस्थानी आहे. आतापर्यंत १ कोटी ४३ लाख ४२ हजार ७१६ नागरिकांचे लसीकरण झाले असून, त्यात आजची संख्या मिळविली तर सुमारे १ कोटी ४८ लाखांच्या आसपास ही संख्या होत असून उद्याच्या लसीकरणानंतर महाराष्ट्र दीड कोटी नागरिकांच्या लसीकरणाचा टप्पा ओलांडेल, असे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.

गुजरात, राजस्थान, उत्तरप्रदेश या राज्यांच्या कैकपटीने महाराष्ट्र पुढे असून २६ एप्रिल रोजी राज्यात आतापर्यंतचे सर्वाधिक ६१५५ लसीकरण केंद्रे होती. त्यामध्ये ५३४७ शासकीय आणि ८०८ खासगी केंद्रांचा समावेश आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात राज्य पहिल्यापासूनच अग्रेसर राहिले आहे. कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्यात लसीकरणाला वेग देण्यासाठी सध्या होत असलेल्या लसीकरणाच्या दुप्पट संख्येने लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून अशाच पद्धतीने लसीकरणाला वेग दिल्यास लवकरच राज्यात दिवसाला आठ लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट गाठता येईल, असे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले.