नवी मुंबई : सिडकोच्या खारघर येथील स्वप्नपूर्ती गृहप्रकल्पातील घरांची सोडत नोव्हेंबर महिन्यात काढण्यात येणार आहे. या प्रकल्पातील घरांसाठी सिडकोने काढलेल्या अर्ज विक्रीला विक्रमी प्रतिसाद मिळाला होता. तब्बल दोन लाख अर्जाची विक्री झाली होती. त्यापैक 85107 अर्जदारांनी प्रत्यक्ष अर्ज भरून सिडकोकडे सादर केले आहे. प्राप्त झालेल्या या सर्व अर्जाची पुढच्या महिन्यात प्रत्यक्ष सोडत काढण्यात येणार आहे.
अत्यल्प आणि मध्यमवर्गीयांसाठी सिडकोच्या वतीने खारघर सेक्टर 36 येथे स्वप्नपुर्ती नावाचा भव्य गृहप्रकल्प उभारण्याचे काम सुरू आहे. या प्रकल्पात 280 आणि 350 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या एकूण 3590 घरांचा समावेश आहे. सध्या शहरात छोटय़ा आकाराची व बजेटमधील घरे उपलब्ध नाहीत. त्यामुळे मागील वर्षभरापासून स्वस्त घरांच्या प्रतिक्षेत असलेल्या मध्यमवर्गीय ग्राहकांच्या सिडकोच्या या गृहप्रकल्पावर अक्षरश: उडय़ा पडल्या. या प्रकल्पातील घरांसाठी जवळपास दोन लाख अर्ज विकले गेले आहेत. तर त्यापैकी 85107 अर्ज सिडकोला प्राप्त झाले आहेत. या सर्व अर्जाची सोडत नोव्हेंबर महिन्यात काढण्यात येणार आहे. त्यादृष्टीने तयारी सुरू असल्याची माहिती सिडकोचे मुख्य जनसंपर्क अधिकारी मोहन निनावे यांनी दिली. (प्रतिनिधी)